"महासप्तमी: काळोखाचा नाश करणारी देवी कालरात्री"

 🌌 देवी कालरात्री 



देवी कालरात्री हे नवदुर्गेचे सातवे रूप आहे. हे दुर्गेचे सर्वात भयानक आणि संहारक रूप मानले जाते. तिचा वर्ण घनदाट अंधारासारखा काळा असून, ती गाढवावर स्वार असते. तिच्या गळ्यात विजेसारखी चमकणारी माळ असते आणि तिचे तीन डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाला निघतात. तिला चार हात असून दोन हातात ती खड्ग (तलवार) आणि लोखंडी अस्त्र धारण करते, तर उर्वरित दोन हात भक्तांना अभय आणि वरदान देणारे आहेत.
 देवीचे रूप जरी भयावह असले तरी ती आपल्या भक्तांना नेहमी शुभ फल देते, म्हणूनच तिला 'शुभंकरी' असेही म्हणतात. तिची पूजा केल्याने भक्तांना कोणत्याही प्रकारच्या भीतीचा (भूतबाधा, अकाली मृत्यू, शत्रूभय) सामना करावा लागत नाही. ग्रहांच्या पीडा, विशेषतः शनीचा प्रकोप शांत करण्यासाठी आजची पूजा अत्यंत प्रभावी मानली जाते.
पौराणिक कथेनुसार, शुंभ-निशुंभ आणि रक्तबीज नावाच्या अत्यंत शक्तिशाली राक्षसांनी तिन्ही लोकांवर ताबा मिळवला होता आणि देवांना स्वर्गातून हाकलून दिले होते. सर्व देव मिळून भगवान शिव आणि देवी पार्वतीकडे मदतीसाठी गेले.
जेव्हा देवी पार्वतीने राक्षसांचा संहार करण्यासाठी महाशक्तीचे रूप धारण केले, तेव्हा युद्धाच्या मैदानात रक्तबीज समोर आला. रक्तबीजला असा वरदान होता की, त्याच्या रक्ताचा एक जरी थेंब जमिनीवर पडला, तर त्या थेंबातून हुबेहूब त्याच्यासारखाच दुसरा शक्तिशाली राक्षस जन्माला यायचा. देवीने जसा त्याच्यावर प्रहार केला, तसे त्याच्या रक्तातून हजारो रक्तबीज निर्माण झाले आणि देवांचे सैन्य मागे हटले.
हे पाहून देवीने अत्यंत क्रोधीत होऊन स्वतःच्या तेजातून देवी कालरात्रीला प्रकट केले. देवी कालरात्रीने राक्षसांना गिळंकृत करण्यास सुरुवात केली आणि दुर्गेने जेव्हा जेव्हा रक्तबीजवर प्रहार केला, तेव्हा त्याचे रक्त जमिनीवर पडण्यापूर्वीच कालरात्रीने ते आपल्या मुखात झेलून प्यायले. रक्त न मिळाल्यामुळे रक्तबीजची शक्ती संपली आणि शेवटी देवीने त्याचा पूर्णपणे वध केला.
🔱  महामंत्र आणि नैवेद्य
मंत्र: एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता। लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी॥ वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा। वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रीर्भयङ्करी॥
नैवेद्य: आज देवी कालरात्रीला गुळाचा किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थांचा भोग (नैवेद्य) दाखवला जातो.

Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday