अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने बंदी घातलेल्या घातक 'चायनीज फटाक्यां’च्या साठ्यांबाबत 'ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या तक्रारीची गंभीर दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी संतोष काकडे यांनी तत्काळ नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा विभागाकडून (पीईएसओ) चायनीज फटाक्यांची साठेबाजी करणाऱ्या दुकानदारांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे सांगून नागपूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व लहान-मोठ्या फटाका गोदामांची तत्काळ सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. बाजारपेठेत छुप्या मार्गाने विक्रीसाठी आलेल्या आणि गोदामांमध्ये साठवलेल्या चायनीज फटाक्यांचा साठा तत्काळ जप्त करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, सणासुदीच्या काळात सामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक लूट थांबवून, त्यांना वाजवी दरात आणि सुरक्षेचे नियम पाळून बनवलेले भारतीय फटाकेच मिळावेत अशी मागणी ग्राहक दक्षता फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे.
या निवेदनाची गंभीर दखल घेत अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी निवेदनातील मुद्द्यांच्या अनुषंगाने तातडीने योग्य ती नियमानुसार कारवाई करण्याचे आणि केलेल्या कारवाईबाबत ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षांना त्यांच्या कार्यालयात अवगत करण्याचे निर्देश दिले आहेत.

