आज शारदीय नवरात्रीची सहावी माळ असून, आजच्या दिवशी दुर्गेचे अत्यंत पराक्रमी रूप देवी कात्यायनी हिची पूजा केली जाते. ऋषी कात्यायन यांच्या कुळात जन्म घेतल्यामुळे त्यांना 'कात्यायनी' हे नाव मिळाले.
ज्या विवाहयोग्य तरुण-तरुणींच्या लग्नात अडथळे येत आहेत, त्यांनी आज देवी कात्यायनीची पूजा केल्यास त्यांचे विवाह जुळण्यास मदत होते, अशी धार्मिक मान्यता आहे.
आजच्या दिवशी लाल, पिवळा किंवा हिरवा रंग परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. देवी कात्यायनीला मधाचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. आज तिला मध अर्पण केल्याने साधकाला सुंदर रूप आणि मनःशांती लाभते.
योग साधनेत या दिवसाला विशेष महत्त्व आहे. देवी कात्यायनीचे स्थान शरीरातील 'आज्ञाचक्रात' (दोन भुवयांच्या मध्ये) असते, ज्यामुळे साधकाला आत्मज्ञान प्राप्त होते.
पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांचे पुत्र ऋषी कात्य झाले. याच कात्य गोत्रात अत्यंत प्रसिद्ध
महर्षी कात्यायन जन्माला आले. ते आदिमाता दुर्गेचे परम भक्त होते. देवी भगवतीने आपल्या घरी पुत्रीच्या रूपात जन्म घ्यावा, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी अनेक वर्षे अतिशय कठीण तपश्चर्या केली.
त्याच काळात
महिषासूर नावाच्या राक्षसाचा अत्याचार तिन्ही लोकांत प्रचंड वाढला होता. त्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश (शिव) यांनी आपल्या तेजाचा काही अंश एकत्र केला आणि त्यातून एक अत्यंत शक्तिशाली देवी प्रकट झाली
. महर्षी कात्यायन यांनी या देवीची सर्वप्रथम पूजा केली, म्हणून तिचे नाव कात्यायनी पडले. ऋषी कात्यायन यांच्या घरी अश्विन कृष्ण चतुर्दशीला हिचा जन्म झाला आणि त्यानंतर शुक्ल सप्तमी, अष्टमी व नवमी अशा तीन दिवस ऋषींनी तिची मनोभावे पूजा केली.
दशमीच्या दिवशी देवी कात्यायनीने सिंहारूढ होऊन महाभयंकर राक्षस महिषासुराचा वध केला आणि विश्वाला त्याच्या जाचातून मुक्त केले. म्हणूनच तिला 'महिषासूरमर्दिनी' असेही म्हटले जाते.
द्वापर युगात वृंदावनातील गोपींनी भगवान श्रीकृष्णाला पती रूपात मिळवण्यासाठी यमुना नदीच्या तीरावर याच देवी कात्यायनीची मनोभावे पूजा केली होती.
🌸 देवी कात्यायनी मंत्र
आजच्या दिवशी देवीची स्तुती करताना खालील मंत्राचा जप करावा:
चंद्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना।
कात्यायनी शुभं दद्याद्देवी दानवघातिनी॥
अर्थ :- महिषासुराचा विनाश करण्यासाठी निराकार देवीने या जगात अवतार घेतला. महर्षी कात्यायन यांनी सर्वप्रथम देवीच्या या तेजस्वी रूपाची उपासना केली, म्हणून ती 'कात्यायनी' या नावाने ओळखली जाऊ लागली. ती स्वयंप्रकाशित असून सिंहावर आरूढ असते आणि तिला चार हात आहेत. तिच्या एका हातात चमकणारी तलवार आहे, दुसऱ्या हातात कमळ आहे; एक हात 'अभय मुद्रा' (निर्भयता प्रदान करणारी मुद्रा) दर्शवतो, तर दुसरा हात 'वर मुद्रा' (भक्तांना आशीर्वाद देणारी मुद्रा) दर्शवतो. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी दुर्गेच्या या रूपाची उपासना केली जाते, ज्यामुळे साधकाला आपले इच्छित पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) प्राप्त होतात.