अमरावती,दि. १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : शासकीय, खासगी आस्थापनांसह दहा किंवा दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या कार्यालये व संस्थांमध्ये महिलांच्या लैंगिक छळाला प्रतिबंध करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या आस्थापनांना ५० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे सर्व संबंधित कार्यालय प्रमुख व आस्थापना मालकांनी कायद्यानुसार समिती स्थापन करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट यांनी केले आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणांची कार्यालये तसेच दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या खासगी कार्यालये व संस्थांमध्ये ही समिती स्थापन करणे आवश्यक आहे.यामध्ये संस्था, संघटना, मंडळे, कंपन्या, कारखाने, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, दुकाने आणि बँका आदींचा समावेश आहे. संबंधित आस्थापनांच्या प्रमुखांनी आवश्यक कार्यवाही करून समिती स्थापन करावी. तसेच तपासणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय व खासगी कार्यालयांनी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यासोबतच सन २०२५-२६ चा वार्षिक अहवाल जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, अमरावती येथे सादर करावा. याशिवाय मासिक व त्रैमासिक अहवाल नियमितपणे सादर करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अंतर्गत तक्रार निवारण समितीची नोंदणी ‘शी बॉक्स’पोर्टलवर करावी. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, त्यांचा आदर व सन्मान राखणे आणि लैंगिक छळाच्या तक्रारींचे योग्य निवारण करणे ही प्रत्येक कार्यालय प्रमुखाची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व संबंधित आस्थापनांनी कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करून महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या वतीने करण्यात आले आहे.