*नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन
अमरावती, दि. ८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सोनेरी, ता. चांदूर बाजार परिसरात रविवार, दि. 6 सप्टेंबर रोजी वाघाच्या हल्ल्यात एका चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या गंभीर घटनेनंतर वनविभाग पूर्णपणे अलर्ट मोडवर आला असून, वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वनविभागाचे पथक सक्रिय झाले आहे. वाघाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
वनविभागाने वाघाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप, थर्मल ड्रोन आणि प्रत्यक्ष क्षेत्रिय पाहणी सुरू केली आहे. तज्ज्ञ पशूवैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षित पथकांच्या मदतीने वाघाचे ठिकाण निश्चित करून त्याला बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधून वनविभागाची पुण्यावरून आणखी चमू अमरावतीमध्ये पाठवण्याची विनंती केली आहे.
सोनेरी, रिद्धपूर, ब्राह्मणवाडा, बहिरम, देऊरवाडा, मालूर पुनर्वसन आणि परिसरातील गावांमधील नागरिकांनी काही दिवस विशेष खबरदारी बाळगावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यात सध्याच्या परिस्थितीत शेतीच्या कामासाठी शेतात जाणे किंवा गुरे चरण्यासाठी जंगलालगतच्या भागात नेणे पूर्णपणे टाळावे. पहाटे, सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडू नये. दाट झुडपे, नाले, नदीकाठ आणि जंगलालगतच्या परिसरात जाणे टाळावे. वाघ दिसल्यास आरडाओरड करू नये, त्याचा पाठलाग करू नये अथवा फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी जवळ जाऊ नये. सोशल मीडियावरील कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये. वाघाला जेरबंद करताना नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करू नये, ज्यामुळे वाघाची हालचाल अनिश्चित होऊन रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा निर्माण होईल. वाघ किंवा इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशूधनाचे नुकसान झाल्यास शासनाच्या नियमानुसार भरपाई देण्यात येईल. तसेच अशी घटना घडल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांची सुरक्षितता ही वनविभागाची प्राथमिकता असून, सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी वनविभागाच्या 'हॅलो फॉरेस्ट' 1296 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा स्थानिक वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी केले आहे.