दत्तक विधानात जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 4, 2026

दत्तक विधानात जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी


एकाच दिवसात ९ बालकांना हक्काचा 'कुटुंबाधारित' निवारा!

 

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संवेदनशीलतेमुळे दत्तक प्रक्रियेला वेग

 

पालकत्व मिळाल्याने पालकांच्या जीवनात आनंदाची पहाट

 

अमरावती, दि. ५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : प्रत्येक बालकाला प्रेम, माया, सुरक्षितता आणि कुटुंबाचा आधार मिळावा, या उदात्त उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या दत्तक विधान प्रक्रियेत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी एकाच दिवशी तब्बल 9 दत्तक प्रकरणांमध्ये आदेश पारित करून या बालकांच्या आयुष्यात नवीन आशा आणि आनंदाचा अध्याय प्रारंभ केला आहे. तसेच पालकत्व मिळाल्याने पालकांच्या जीवनात आनंदाची पहाट उगविली आहे.एकाच दिवशी जिल्ह्यातील बाल संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण बाब असून, प्रशासनाची संवेदनशीलता, तत्परता आणि बालकांच्या सर्वोत्तम हितासाठी असलेली बांधिलकी याचे हे उत्तम उदाहरण ठरल्याची भावना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी व्यक्त केली आहेत.

 

     ‘प्रत्येक बालकाला सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंबामध्ये वाढण्याचा अधिकार आहे. दत्तक विधान प्रक्रिया ही केवळ एका कायदेशीर आदेशापुरती मर्यादित नसून ती एका बालकाच्या संपूर्ण आयुष्याला नवी दिशा देणारी प्रक्रिया आहे. बालकांच्या सर्वोत्तम हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन पात्र दत्तक प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. एकाच दिवशी 9 दत्तक आदेश पारित होणे ही निश्चितच समाधानाची बाब असून, यामुळे या बालकांना नवीन कुटुंब,नवीन नाती आणि उज्ज्वल भविष्याची संधी प्राप्त झाल्याचे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सांगितले.

 

      बालकांचे संस्थात्मक संगोपन करण्यापेक्षा शक्य असेल तेथे त्यांना कुटुंबाधारित संगोपन उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे आहे. दत्तक प्रक्रियेद्वारे बालकाला केवळ निवारा मिळत नाही, तर त्याला आपलेपण, भावनिक आधार, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण मिळते. त्यासोबतच पालकांना बाल संगोपनाची जबाबदारी मिळाली आहे.

 

     बालकांचे हित, संभाव्य दत्तक पालकांची पात्रता, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तसेच कायदेशीर प्रक्रियेची पडताळणी व सर्व बाबींचा सखोल विचार करून जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी 9 प्रकरणांमध्ये दत्तक आदेश पारित केले. पालकांच्या संगोपनापासून वंचित राहिलेल्या बालकांना कायमस्वरूपी प्रेमळ कुटुंब मिळवून देण्याच्या दिशेने उचललेले हे अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या निर्णयामुळे बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि स्थिर कौटुंबिक वातावरणात वाढण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

 

     दत्तक विधान प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, तसेच बाल संरक्षण अधिकारी भूषण कावरे यांच्या समन्वयातून आवश्यक कार्यवाही करण्यात आली.

बालकांच्या संरक्षण, पुनर्वसन आणि कुटुंबाधारित संगोपनाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, विशेष दत्तक संस्था आणि संबंधित यंत्रणांमध्ये सातत्याने समन्वय साधण्यात आला. पात्र बालकांच्या दत्तक प्रक्रियेतील आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.दत्तक विधान प्रक्रियेत बालकांचे सर्वोत्तम हित, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, संबंधित यंत्रणांशी समन्वय आणि प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर आवश्यक कार्यवाही करण्यासाठी बाल संरक्षण अधिकारी भूषण  कावरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. बालकांना संस्थात्मक संगोपनाऐवजी शक्य तेथे कुटुंबाधारित संगोपन उपलब्ध करून देणे, तसेच बालकांच्या पुनर्वसनासाठी कायदेशीर व सुरक्षित मार्गाने कार्यवाही करणे यासाठी बाल संरक्षण यंत्रणा सातत्याने प्रयत्नशील आहे.

 

'बालकाला कुटुंबाचा आधार मिळणे अत्यंत महत्त्वाचे'- अजय डबले

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करत सांगितले, ‘बालकाला कुटुंबाचा आधार मिळणे ही त्याच्या भावनिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. दत्तक विधान प्रक्रियेमध्ये प्रत्येक प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले जाते. संबंधित सर्व यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष सातत्याने प्रयत्नशील आहे.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकरणांना गती मिळाली असून, एकाच दिवशी 9 दत्तक आदेश पारित होणे, ही बाल संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय उपलब्धी आहे.’

 

        दत्तक प्रक्रिया ही समाजातील संवेदनशील आणि जबाबदार नागरिकांनी सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कायदेशीर प्रक्रियेतून दत्तक घेतलेल्या बालकाला कुटुंबाचा आधार देणे हे अत्यंत मोठे सामाजिक योगदान आहे. पात्र आणि इच्छुक पालकांनी अधिकृत प्रक्रियेची माहिती घेऊन कायदेशीर मार्गाने दत्तक विधान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असा संदेशही या निमित्ताने देण्यात आला. जिल्ह्याच्या बाल संरक्षण व्यवस्थेतील ही कामगिरी निश्चितच प्रेरणादायी आणि उल्लेखनीय ठरत आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages