मृत्यूचे प्राथमिक कारण समोर; अंतिम अहवालाची प्रतीक्षा
अमरावती, दि. ९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या आणि चार नागरिकांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला अखेर वन विभागाने जेरबंद केले होते. परंतु, सोमवारी (७ सप्टेंबर )सायंकाळी या वाघिणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर 'कार्डिओ रेस्पिरेटरी फेल्युअर' मुळे (हृदय व श्वासोच्छवास बंद पडल्याने) वाघिणीचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून मृत्यूचे नेमके व अचूक कारण स्पष्ट होण्यासाठी वाघिणीच्या अवयवांचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याची माहिती, अमरावती प्रादेशिक विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुना के.आर. यांनी दिली आहे.
या वाघिणीला शिरजगाव कसबा परिसरात जेरबंद करण्यात आले होते.
चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी आणि शिरजगाव कसबा परिसरात या वाघिणीने २४ तासांत दोन जणांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना ठार केले होते. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व भीतीचे वातावरण होते. वन विभागाच्या विशेष पथकाने ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारच्या सुमारास शिरजगाव कसबा परिसरात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गुंगीचे औषध देऊन या वाघिणीला यशस्वीरीत्या जेरबंद केले होते.
प्रमाणभूत प्रचलित कार्यपद्धतीनुसार वाघिणीला बेशुद्ध केल्यानंतर पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूकडून तिच्यावर तातडीने पुढील औषधोपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, वाघिणीने या उपचारांना पुरेसा प्रतिसाद दिला नाही.परिणामी, ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
मंगळवारी, ८ सप्टेंबर २०२६ रोजी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने एनटीसीएच्या नियमावलीनुसार मृत वाघिणीचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालानुसार, प्रथमदर्शनी वाघिणीच्या मृत्यूचे कारण 'कार्डिओ रेस्पिरेटरी फेल्युअर' (हृदय व श्वासोच्छवास बंद पडणे) असल्याचे समोर आले आहे.
वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी मारण्यात आलेला डार्ट आणि औषधाच्या तीव्रतेबाबत विविध प्रसारमाध्यमांवर तसेच वृत्तपत्रांमध्ये उलटसुलट चर्चा व तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाने स्पष्ट केले आहे की, मृत्यूचे नेमके व अचूक कारण स्पष्ट व्हावे यासाठी वाघिणीच्या अवयवांचे नमुने 'हिस्टोपॅथॉलॉजी' आणि 'टॉक्सिकॉलॉजी' चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत आहेत. या प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल आल्यानंतरच वाघिणीच्या मृत्यूचे मूळ कारण स्पष्ट होईल, असे उपवनसंरक्षक अर्जुना के.आर. यांनी सांगितले आहे.