दि. १८ चांदूरबाजार : देशभरात १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा होत असताना चांदूरबाजार तालुक्यातील विश्रोळी येथील एका वृद्ध महिला व तिच्या अपंग कुटुंबास घरासंदर्भातील प्रश्नावरून बेघर होण्याची वेळ आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाजवळ वृद्ध महिलेने उपोषण सुरू केले.
सुमारे ७० वर्षांच्या वृद्ध महिलेने स्वातंत्र्यदिनीच आपल्या हक्कासाठी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित प्रकरणात आवश्यक कागदपत्रे सादर करूनही न्याय मिळत नसल्याचा दावा महिलेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
एका बाजूला शासनाकडून गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, वृद्ध आणि दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आदेश दिले जातात; तर दुसऱ्या बाजूला एका वृद्ध महिलेला आपल्या हक्कासाठी तहसील कार्यालयाच्या दारात उपोषण करण्याची वेळ येत असेल, तर ही बाब निश्चितच गंभीर आणि चिंताजनक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
उपोषणाला बसलेल्या वृद्ध महिलेने प्रशासनासमोर आपली व्यथा मांडताना, आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला बेघर करून रस्त्यावर आणले जात असल्याचा आरोप केला. "वृद्धापकाळात आधाराची गरज असताना घराचा प्रश्न निर्माण झाल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. माझे वय झाले आहे, या वयात मला न्यायासाठी रस्त्यावर बसावे लागत आहे. माझ्याकडे आवश्यक कागदपत्रे असूनही माझ्या हक्काचा प्रश्न सुटत नाही. न्याय मिळेपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. जीव गेला तरी मागे हटणार नाही," असा इशारा वृद्ध महिलेने प्रशासनाला दिला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला आपल्या हक्कासाठी उपोषणाल बसावे लागणे ही बाब प्रशासनासाठी निश्चितच आत्मपरीक्षणाची आहे, अशी खंत व्यक्त करून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन समस्येचे निराकरण करण्याची मागणी या वृद्धेने प्रशासन व शासनाला केली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच एका वृद्ध महिलेवर उपोषणाची वेळ आल्यामुळे स्थानिक प्रशासनासाठी ही बाब आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली आहे. आता चांदूरबाजारचे प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन घटनास्थळी जाऊन या समस्येचे तातडीने निराकरण करणार का आणि त्या वृद्ध महिलेला न्याय देणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.