अमरावती, दि. २९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सोमठाना खुर्द येथील 42 शेतमुल्यांकनधारक, 21 वनहक्कधारक आणि 112 घरमुल्यांकनधारकांकरिता निधी उपलब्ध झाला असून काही लाभार्थ्यांना मोबदला रक्कम वितरीत करण्यात आली आहे. आवश्यक दस्तऐवजा अभावी उर्वरित लाभार्थ्यांना मुल्यांकन रक्कम अदा करण्यास अडचण येत आहे, अशा लाभार्थ्यांना अकोट वन्यजीव विभाग अकोट येथे तातडीने दस्तऐवज सादर करण्याचे आवाहन, अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक आर.एस.टोलिया यांनी केले आहे.
वर्ष 2012 च्या शासन निर्णयानुसार सोमठाना खुर्द या गावाचे वर्ष 2013-14 मध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. या गावातील शेतमुल्यांकनधारक आणि वनहक्कधारकांना मुल्यांकनाची 4 पट रक्कम देय असून यातील 1 पट मुल्यांकन रक्कम व त्यावरील 30 टक्के दिलासा रक्कम वजा करून उर्वरीत मोबदला रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु काही शेतमुल्यांकनधारक, वनहक्कधारक आणि घरमुल्यांकनधारकांनी आवश्यक दस्तऐवज सादर नकेल्याने त्यांना मोबदला अदा करण्यात अडचण येत आहे. या सर्व शेतमुल्यांकनधारक आणि वनमुल्यांकनधारकांनी 100 रुपयांच्या स्टँपपेपर वर अर्ज, बँक खात्याची छायाप्रत,शेतीचा 7/12 आणि शेतमुल्यांकनधारक मयत असल्यास त्यांचे वारसप्रमाणपत्र व वारसाच्या खात्याची छायाप्रत तसेच घरमुल्यांकनधारकांनी 100 रुपयांच्या स्टँपपेपर वर अर्ज, बँक खात्याची छायाप्रत,नमुना 8, घरमुल्यांकनधारक मयत असल्यास त्यांचे वारसप्रमाणपत्र व वारसाच्या खात्याची छायाप्रत तातडीने अकोट वन्यजीव विभाग अकोट येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोमठाना खुर्द येथील लाभार्थ्यांची नाव निहाय यादी mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.