दिनांक: २१ ऑगस्ट २०२६
अमरावती, दि. २१ : सद्भावना दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सद्भावना प्रतिज्ञा घेतली.
यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली. जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा यावरून कोणताही भेदभाव न करता सर्व भारतीय जनतेमध्ये भावनिक ऐक्य व सामंजस्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
तसेच समाजातील विविध मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता विचारविनिमयाच्या माध्यमातून आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. देशाची एकता, अखंडता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सद्भावना, शांतता, परस्पर आदर आणि बंधुभावाच्या माध्यमातून समाजात एकोपा निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक योगदान देण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमास अपर आयुक्त (विकास/आस्थापना) संतोष कवडे, उपायुक्त (पुरवठा) नरेंद्र वंजारी, तहसीलदार अनिता झाडे, सागर ढोमसे, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख, संजय मुरतकर, मधुकर धुळे, संदिप टांक, आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.