छत्रपती शिवरायांच्या विचारांवर नवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्र - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, August 31, 2026

छत्रपती शिवरायांच्या विचारांवर नवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्र

 


 

            नवी दिल्ली, दि. 1 : छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, प्रशासन व्यवस्था आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांसंदर्भात नवी दिल्लीत दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जयिष्णू : सहिष्णू भारताचे रक्षक’ या विषयावर 2 व 3 सप्टेंबर 2026 रोजी जेएनयूच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे चर्चासत्र होणार आहे.


            शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे केवळ युद्ध आणि पराक्रमाच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यांची प्रशासन व्यवस्था, राज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय, मराठा आरमार, संस्कृत साहित्यातील शिवरायांचे संदर्भ तसेच पुढील काळातील मराठ्यांचा दिल्लीवरील प्रभाव अशा विविध पैलूंवर चर्चासत्रात तज्ज्ञांकडून विचारमंथन केले जाणार आहे.


चर्चासत्राचा उद्घाटन सोहळा २ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री पंडित यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तंजावर घराण्याचे  प्रतिनीधी बाबाजी भोसले मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक प्रशांत खेडेकर विशेष अतिथी, तर प्रसिद्ध विचारवंत मुकुल कानिटकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील.

उद्घाटनानंतर खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी ‘एक हजार वर्षांचा हिंदू प्रतिकार’या विषयावर विचार मांडतील. तसेच शिवरायांचा राज्याभिषेक व प्रशासन, महाराजांची दक्षिण मोहीम आणि संस्कृत साहित्यातील शिवरायांचे संदर्भ या विषयांवर विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. पहिल्या दिवसाचा समारोप कवी भूषण यांच्या काव्यावर आधारित ‘शिवराज भूषण’ या महानाट्याने होणार आहे.

दुसऱ्या दिवशी, तीन सप्टेंबर रोजी शोधनिबंध सादरीकरणासह विविध तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये ‘मराठा आरमार’, औरंगजेबाच्या वेढ्यादरम्यान मराठ्यांचा संघर्ष तसेच ‘18 व्या शतकातील दिल्लीवरील मराठ्यांचे वर्चस्व’ या विषयांवर इतिहास संशोधक व अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत.

या चर्चासत्राचा समारोप ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा चारला होणार असून, जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित अध्यक्षस्थानी राहतील. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुख्य अतिथी, तर ज्येष्ठ विचारवंत प्रदीप रावत आणि प्रा. हिरामण तिवारी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages