टिटंबा आश्रमशाळेतील सर्व ७० विद्यार्थ्यांची प्रकृती बरी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, July 27, 2026

टिटंबा आश्रमशाळेतील सर्व ७० विद्यार्थ्यांची प्रकृती बरी








*अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अमरावती, दि. २८ : धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना २५ जुलै रोजी सायंकाळी अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे आढळून आली आहे. आता मात्र तालुक्यातील इतर शाळांमधील काही विद्यार्थी घाबरून पोटदुखी आणि अतिसार झाल्याचे सांगत आहे. विद्यार्थ्यांची तपासणी केली असता त्यांना कोणताही आजार अथवा अन्नातून विषबाधा झालेली नाही. याप्रकरणी जिल्हा प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून असून पालक आणि विद्यार्थ्यांनी घाबरून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिटंबा येथील प्रकारानंतर इतर शाळांमधील विद्यार्थीही आरोग्याच्या तक्रारी करीत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना कोणताही आजार झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. कालच्या घटनेमुळे विद्यार्थी घाबरून आरोग्यविषयक तक्रारी करीत आहे. तसेच अफवा पसरल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याने घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दि. २५ जुलै रोजी जेवण केल्यानंतर सुमारे ७० विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि चक्कर येणे असा त्रास सुरू झाला. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवून सर्व विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांची तब्येत पूर्णपणे बरी असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तत्काळ रुग्णवाहिकांची व्यवस्था करून बाधित ७० विद्यार्थ्यांना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. यातील सर्व विद्यार्थी पूर्णपणे बरे झाले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून टिटंबा येथील शासकीय आश्रमशाळेत उर्वरित विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी एक वैद्यकीय पथक, पुरेसा औषधसाठा आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागातर्फे आश्रमशाळेतील अन्न आणि पाण्याचे नमुने घेण्यात आले आहे.
उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, उपचाराधीन असलेल्या सर्व ७० विद्यार्थ्यांची प्रकृती पूर्णपणे बरी असून कोणाच्याही जीविताला धोका नाही. त्यामुळे नागरिक व पालकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासन व आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages