*प्रस्ताव पाठविण्याचे शेतमालकांना आवाहन
अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी शेतजमीन खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक शेतमालकांनी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सन 2025-26 करीता शेतमालकांना वैयक्तिक मालकीची शेतजमिन विक्री करावयाची असल्यास शेतजमीन विक्रीसंबंधी प्रस्ताव समाजकल्याण कार्यालयात सादर करावे लागणार आहे. त्यानुषंगाने एकूण शेतीचा सातबारा व आठ अ, तलाठी यांचा चर्तु:सिमेचा नकाशा आणि शेतमालकांची नाव व पत्ता जोडावेत. विक्रीसाठी शेतीचा फेरफार, शेतीवर कोणतीही थकबाकी नसल्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, तलाठी प्रमाणपत्र, शेतीचा सर्च रिपोर्ट, शेत जमिन मोजणीची क प्रत, शपथपत्र, कुटुंबातील व्यक्तींचे संमतीपत्र, दुय्यम निबंधकांकडून शेत जमिनीचे मुल्यांकन पत्र, शेती योग्य व पिकावू असल्याबाबत तालुका कृषी अधिकारी यांचा अहवाल, गाव नकाशाची प्रत, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड जोडावे लागणार आहे.
जमिन विक्रीच्या दरास जिल्हास्तरीय समितीमार्फत मंजुरी देण्यात येईल व त्यानुसार जमिनीचे दर निश्चित होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.