अमरावती, दि.१३ : अमरावती विभागातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२६-२७ राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून, पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी केले आहे.
शासन निर्णय दि. ३ जुलै २०२६ नुसार ही योजना Cup & Cap Model (80:110) अंतर्गत खरीप २०२६ व रब्बी २०२६-२७ हंगामासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे, कृषी उत्पादनातील जोखीम कमी करणे आणि आर्थिक स्थैर्य राखणे हा योजनेचा उद्देश आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Agristack Farmer ID) असणे तसेच डिजिटल पीक सर्वेक्षण (DCS) मध्ये पिकांची नोंद करणे अनिवार्य आहे. प्रति अर्ज किमान ०.१० हेक्टर क्षेत्राची अट असून, खातेदार, कुळाने किंवा नोंदणीकृत भाडेकरारावर शेती करणारे शेतकरी पात्र आहेत.
योजनेअंतर्गत खरीप पिकांसाठी शेतकरी हिस्सा २ टक्के, रब्बी पिकांसाठी १.५ टक्के आणि नगदी पिकांसाठी ५ टक्के इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे. योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.
खरीप २०२६ साठी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी (बुलढाणा, वाशिम), एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी (अकोला) आणि इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी (अमरावती, यवतमाळ) यांची विमा कंपन्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय पीकनिहाय शेतकरी हिस्सा विमा हप्ता दर प्रति हेक्टर पुढीलप्रमाणे आहेत. बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीनसाठी ₹१,२५०, मूगसाठी ₹७५, उडीदसाठी ₹६७.५०, तुरीसाठी ₹९४०, कापसासाठी ₹१,३०० आणि मक्यासाठी ₹१०० विमा हप्ता आहे. अकोला जिल्ह्यात खरीप ज्वारीसाठी ₹८२.५०, सोयाबीनसाठी ₹१,२१८, मूग व उडीदसाठी प्रत्येकी ₹४७८.८०, तुरीसाठी ₹८७३.६० आणि कापसासाठी ₹६०९ विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात सोयाबीनसाठी ₹१,२१८, मूग व उडीदसाठी प्रत्येकी ₹५९.८५, तुरीसाठी ₹८७३.६० आणि कापसासाठी ₹१,२१८ विमा हप्ता आहे. अमरावती जिल्ह्यात भातासाठी ₹६५०, खरीप ज्वारीसाठी ₹६६०, सोयाबीनसाठी ₹१,२५०, मूगसाठी ₹५९४, तुरीसाठी ₹९४०, कापसासाठी ₹९७५ आणि मक्यासाठी ₹८०० विमा हप्ता आहे. यवतमाळ जिल्ह्यात खरीप ज्वारीसाठी ₹६२८, सोयाबीनसाठी ₹९६०, मूगसाठी ₹५६०, उडीदसाठी ₹५४०, तुरीसाठी ₹९४० आणि कापसासाठी ₹१,२५० प्रति हेक्टर शेतकरी हिस्सा विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय किंवा नियुक्त पीक विमा कंपनीशी संपर्क साधून ३१ जुलै २०२६ पूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी केले आहे.