Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अमरावती जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू;


 30 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

अमरावती, दि. ०६(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिक मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 8 वी ते 10 वी शालेय स्तर, तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये मोफत निवास, भोजन व इतर सर्व सोयी-सुविधा पुरविल्या जातात. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी सर्वप्रथम https://hmas.mahait.org या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असून, त्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून ती संबंधित वसतिगृहात ऑफलाईन पद्धतीने जमा करणे आवश्यक आहे.

अमरावती शहरातील निंभोरा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (युनिट क्र. 1, 2, 3) व संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, तसेच मुलींसाठी कॅम्प परिसरातील व जेल रोडवरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहाच्या विविध युनिट्समध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यासोबतच जिल्ह्यातील तालुका स्तरावरील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्येही अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. वेळापत्रकानुसार, इयत्ता 8 वी ते 10 वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 असून, त्यांची पहिली प्रवेश यादी 7 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल.  कनिष्ठ महाविद्यालय व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज सादर करता येतील, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत आपले अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले असून, अधिक माहितीसाठी 0721-2661261 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments