विदर्भात ३० जूनपासूनच वाजणार शाळेची घंटा" - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, June 15, 2026

विदर्भात ३० जूनपासूनच वाजणार शाळेची घंटा"

 


अमरावती दि. १५ :-

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भातील शाळा ३० जून २०२६ पासून सुरू करण्याचे थेट आदेश दिले आहेत. विदर्भातील कडाक्याचे ऊन आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून न्यायालयाने शालेय शिक्षण विभागाचे आधीचे सर्व परिपत्रक रद्दबातल ठरवले आहेत. यामुळे विदर्भातील लाखो विद्यार्थी आणि पालकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. 

शिक्षण विभागाने २८ मार्च रोजी राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून, तर त्यानंतर ९ जून रोजी सुधारित परिपत्रक काढून विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने हे दोन्ही आदेश अवैध ठरवून पूर्णपणे रद्द केले. 


'महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती'चे विजय कोंबे आणि लीलाधर ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

 न्यायालयाने स्पष्ट केले की, २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार (GR) विदर्भातील शाळा ३० जून रोजीच सुरू कराव्या लागतील. 

 "विदर्भातील तापमान जून महिन्यात ४२ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. अशा कडक उन्हात शाळा सुरू करण्याचा हट्ट कशासाठी?" असा संतप्त सवाल न्यायालयाने शिक्षण विभागाला विचारला. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ३ ते ५ किलोमीटर अंतर पायी जावे लागते. दुपारी कडक उन्हात घरी परतणे विद्यार्थ्यांच्या जिवासाठी धोकादायक ठरू शकते, अशी चिंता न्यायालयाने व्यक्त केली. 

 २००७ मध्येही सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने विदर्भासाठी वेगळा नियम निश्चित केला होता. जुने आदेश अस्तित्वात असताना शिक्षण संचालकांनी वारंवार नवीन परिपत्रके काढून संभ्रम निर्माण केल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि यापुढे असे केल्यास न्यायालयाच्या अवमानाचा खटला चालवण्याचा इशारा दिला. 

शाळा सुरू होणार: विदर्भातील सर्व शाळा आता ३० जून २०२६ रोजी सुरू होतील.

सकाळचे सत्र: ३० जून रोजी शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला वर्ग सकाळच्या सत्रात भरवले जातील.

नियमित वेळ: त्यानंतर १ जुलै २०२६ पासून विदर्भातील शाळा त्यांच्या नेहमीच्या नियमित वेळेत सुरू होतील.

 विदर्भ वगळता मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शाळा आज १५ जूनपासूनच पूर्व नियोजित वेळेनुसार सुरू झाल्या आहेत. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages