मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, June 15, 2026

मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी;






'अमृत मानसमित्र' समुपदेशक प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

· १५ ते २२ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

· महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे यांचे तांत्रिक सहकार्य

    अमरावती, (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) दि. १५ 

     

       आजच्या वेगाने बदलणाऱ्या शैक्षणिक आणि सामाजिक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक ताणतणाव, भावनिक समस्या, वर्तनात्मक अडचणी, सोशल मीडिया व डिजिटल व्यसन आणि करिअरविषयक संभ्रम यांसारख्या अनेक गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हीच सामाजिक गरज ओळखून महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेने पुढाकार घेतला असून, त्यांच्या वतीने "अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम" राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी पहिल्या बॅचकरिता येत्या १५ जून ते २२ जून २०२६ या कालावधीत इच्छुक युवक-युवतींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत, अशी माहिती अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.


          या विशेष उपक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे ही महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. 'एमआयएमएच'कडे मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचा दीर्घ अनुभव असून, या अनुभवाच्या आधारे प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, पद्धती, पर्यवेक्षण आणि गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी त्यांच्यामार्फत पार पाडली जाईल. या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी समुपदेशनाची मूलतत्त्वे, बाल व किशोर मानसिक आरोग्य, संवाद कौशल्ये, तणाव व्यवस्थापन, जीवनकौशल्य शिक्षण, आत्महत्या प्रतिबंध, सायबर सुरक्षा आणि डिजिटल आरोग्य अशा विविध महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींना स्वयंरोजगार आणि व्यावसायिक विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.


          हे संपूर्ण प्रशिक्षण हायब्रीड म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात असेल. यामध्ये १५ दिवसांचे प्रत्यक्ष वर्ग प्रशिक्षण महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे येथे होणार असून, एक महिन्याची निरीक्षणाधारित क्षेत्रीय नियुक्ती, ऑनलाईन तज्ज्ञ सत्रे, केस चर्चा आणि सहा महिन्यांचे मार्गदर्शन समाविष्ट आहे. पुणे येथील १५ दिवसांच्या ऑफलाईन प्रशिक्षणादरम्यान निवास आणि भोजनाची व्यवस्था विद्यार्थ्यांनी स्वतः करायची आहे, मात्र अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांचा ६ महिन्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च अमृत संस्थेमार्फत केला जाणार असल्याने हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असेल. प्रत्येक जिल्ह्यातील गरज आणि विद्यार्थी संख्या विचारात घेऊन एका बॅचमध्ये किमान २० ते कमाल ३० उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.


          या प्रशिक्षणासाठी एम.ए. किंवा एम.एस्सी. (मानसशास्त्र / समुपदेशन मानसशास्त्र) आणि मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) ही शैक्षणिक पात्रता असलेले अमृतच्या लक्षित गटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जासोबत डोमेसाईल, उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा पुरावा जोडणे आवश्यक असून 'प्रथम येईल त्यास प्राधान्य' या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांना "अमृत मानसमित्र समुपदेशक" प्रमाणपत्र प्रदान केले जाईल, ज्याच्या आधारे शाळा-महाविद्यालयांमध्ये समुपदेशक, जीवनकौशल्य व मानसिक आरोग्य जनजागृती प्रशिक्षक, विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून कार्य करण्याची किंवा खाजगी स्वरूपात स्वयंरोजगार सुरू करण्याची संधी मिळेल. इच्छुकांनी अमृत संस्थेच्या https://mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर मुदतीत ऑनलाईन अर्ज करावा, तसेच अधिक माहितीसाठी अमृतच्या जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘अमृत’व्दारे करण्यात आले आहे.



 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages