Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

तळीरामांचे 'ओपन बार' आणि सुसाट गाड्या



 जुना बाय पास रस्त्यावर कायदा-सुव्यवस्थेचे वाजले बारा

 

दि. ११ अमरावती: जुना बायपास रस्ता सध्या रात्रीच्या वेळी समाजकंटक आणि मद्यपींचा अड्डा बनला असून, या मार्गावरून प्रवास करणे सामान्य नागरिकांसाठी अत्यंत जोखमीचे झाले आहे. रात्रीच्या वेळी होणारा मद्यपींचा गोंधळ, सुसाट धावणारी वाहने आणि वाढती गुंडगिरी यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास येथे एखादी मोठी अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

ढाब्यांची संख्या वाढल्याने मद्यपींचा राबता

या रस्त्यावर ढाब्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या ढाब्यांवर तळीरामांची मोठी गर्दी जमते. मद्यधुंद अवस्थेत बाहेर पडल्यानंतर हे मद्यपी रस्त्यावरच मोठा गोंधळ घालतात. अनेकदा विनाकारण सामान्य नागरिकांना अडवून त्यांना जोरजोरात शिवीगाळ करणे, वाद घालणे आणि मारहाणीचे प्रकार या परिसरात नित्याचेच झाले आहेत.

 

'हुल्लडबाजांच्या टोळ्या' सक्रिय; नागरिकांवर फेकतात घाणेरडे पाणी

या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून शांततेत चालणाऱ्या पादचाऱ्यांवर आणि दुचाकीस्वारांवर घाणेरड्या पाण्याचे फुगे फेकणाऱ्या टवाळखोरांच्या टोळ्या या परिसरात सक्रिय आहेत. केवळ मज्जा म्हणून केल्या जाणाऱ्या या प्रकारामुळे महिला आणि पादचाऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

 

रात्रीच्या वेळी मृत्यूचा खेळ; 'रॅश ड्रायव्हिंग'मुळे अपघाताची भीती

रात्री अकरानंतर या रस्त्यावरील वाहतुकीचे नियम पूर्णपणे कोलमडतात. मद्य प्राशन करून अत्यंत वेगाने आणि निष्काळजीपणे गाड्या चालवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे या रस्त्यावरून पायी चालणे किंवा दुचाकीने प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे.

 

तातडीने खबरदारी घेणे गरजेचे; नागरिकांची मागणी

"सध्या या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी कुटुंबासह जाणे अशक्य झाले आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे सर्वसामान्य नागरिक घाबरलेले आहेत. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन रात्रीची गस्त वाढवावी आणि बेकायदेशीर ढाब्यांवर कारवाई करावी," अशी मागणी परिसरातील त्रस्त नागरिकांनी केली आहे.

 

वेळ निघून जाण्यापूर्वी आणि एखादा मोठा अनर्थ घडण्यापूर्वी अमरावती पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाने या परिसरात कडक कोंबिंग ऑपरेशन राबवून हुल्लडबाजांना चाप लावावा, अशी तीव्र भावना आता जनमानसात उमटत आहे.

 

Tags

Post a Comment

0 Comments