जिल्हा प्रशासन उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, April 21, 2026

जिल्हा प्रशासन उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज




* 'इन क्रिस' प्रकल्पाद्वारे उपाययोजनांना वेग

अमरावती, दि. 22 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. हवामान लवचिकता मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे इंटिग्रेटेड क्लायमेट रिस्क मॅनेजमेंट इन इंडिया हा प्रकल्प जिल्ह्यात राबविला जात आहे.

या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्वात असुरक्षित घटक, म्हणजेच शेतकरी आणि कृषी कामगारांचे अति उष्णतेपासून संरक्षण करणे हे आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुसदा, यावली, शिराळा, रोहनखेड, भातकुली, खोलापूर आणि दर्यापूर-दारापूर या सहा गावांसह निवडक ब्लॉक्समध्ये सखोल मूल्यांकन करण्यात आले आहे. या मूल्यांकनात अल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी, शेतमजूर, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांचा सहभाग होता.

यासाठी केलेल्या सर्वेक्षणातून पिण्याचे पाणी, सावली आणि विश्रांतीच्या जागांची कमतरता असल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होत असून यात उष्णता प्रतिरोधक शितकक्ष कॉरिडॉर आणि विश्रांती क्षेत्रे, थंड पाण्याचे डिस्पेंसर बसवणे, बाहेर काम करणाऱ्या मजूर आणि शेतकऱ्यांसाठी हिरव्या शेडची उभारणी, स्थानिक पातळीवर योग्य शीतकरण उपाययोजनांद्वारे आरोग्य आणि उत्पादकता टिकवून ठेवणे उपाययोजना करण्यात येणार आहे.

या उपक्रमात केवळ भौतिक सुविधाच नव्हे, तर प्रशिक्षणावरही भर दिला जात आहे. यामध्ये उष्णतेच्या लाटेत ‘काय करावे आणि काय करू नये’ याबाबत प्रशिक्षण सत्रे, विशिष्ट उष्णता असुरक्षिततेवर चर्चा आणि माहिती शिक्षण साहित्याचे वाटप केले जात आहे. ज्या गावांमध्ये सर्वेक्षण झाले, तेथील ग्रामस्थ आणि स्थानिक प्रतिनिधींसाठी विशेष कार्यशाळाही घेण्यात आली आहे.

वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात उष्माघाताविषयी जनजागृती आणि प्रसिद्धी मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी दिली.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages