जिल्ह्यात 'एचटीबीटी' कापूस बियाण्यांवर बंदी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 1, 2026

जिल्ह्यात 'एचटीबीटी' कापूस बियाण्यांवर बंदी

 



*नियमांचे उल्लंघन केल्यास 5 वर्षे कारावास

अमरावती, दि. २ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात खरीप हंगाम 2026-27ची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. कापूस लागवडीसाठी शासनाची मान्यता नसलेल्या बीजी-3 (एचटीबीटी) बियाण्यांचा वापर टाळावा, असे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत. नियमाचे उल्लंघन केल्यास पाच वर्षे कारावास आणि एक लाख रूपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

शासनाने केवळ बीजी-1 आणि बीजी-2 या वाणांच्या कापूस बियाण्यांना मान्यता दिली आहे. 'राउंडअप बीटी', 'चोर बीटी', 'वीडगार्ड' किंवा एचटीबीटी यासारखी बियाणे बेकायदेशीर असून ती पर्यावरणास घातक आहेत. या बियाण्यांचा वापर केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बियाणे केवळ अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे. खरेदी करताना पक्के बिल अवश्य घ्यावे. त्यात पीक, वाण, लॉट क्रमांक आणि कंपनीचे नाव असल्याची खात्री करावी. पॅकेटवर सरकारमान्य अधिकृत चिन्ह तपासावे. बीजी-2 (बोलगार्ड 2) वाणाची किंमत 901 रूपये आहे. बियाणे पाकीट पूर्णपणे सीलबंद असल्याची खात्री करावी. पाकीटावरील बियाणे उगवणीची अंतिम मुदत तपासून पहावी. सर्व वाणांमध्ये बीजी-2 तंत्रज्ञान सारखेच असल्याने विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कापूस लागवड करू नये, पूर्व हंगामी लागवड टाळावी. विक्रेत्याने पक्के बिल देण्यास नकार दिल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) यांच्याशी संपर्क साधावा.

बेकायदेशीर बियाणे विनापावती आणि चढ्या दराने विकले जातात. त्यांच्या पाकीटावर गुणवत्तेचे विवरण, तंत्रज्ञान किंवा कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली आहे, याचा कोणताही उल्लेख नसतो. जिल्ह्यात जर अशा बोगस बियाण्यांची विक्री किंवा लागवड करताना आढळल्यास, तात्काळ कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना कळवावे. ही माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी कळविले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages