डॉ. बाबासाहेब आंबेडकर , बाबासाहेब तूमच्यासमोर किती गऱ्हाणं मांडू ? - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 15, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर , बाबासाहेब तूमच्यासमोर किती गऱ्हाणं मांडू ?



दि. 15 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तूम्ही एक नाव नाही तर  अन्यायाविरूद्ध लढण्याची शक्ती आहात.शतकानु शतकाच्या जाती भेदाला चोख उत्तर देणारे,भावी पिढ्यांसाठी संविधान एक अनमोल ठेव देणारे तूम्ही आहात. 

धर्माच्या नावाखाली जुलूम अत्याचार सोसणाऱ्या कोट्यावधी अस्पृश समाजाला बाहेर काढून मानाचे स्थान देणारे खरेखूरे भारताचे रत्न बाबासाहेब तूम्हाला त्रिवार वंदन.लोक गोमुत्र पीतात परंतू हाडामासाच्या माणसांना विटाळ मानतात अशा समाजातील अमानवी रुढींना बळी पडणाऱ्या  दलितांचे बाबासाहेब तूम्ही उद्धारकर्ता झालात.तिसाव्या वर्षापासून तूम्ही सामाजिक जीवनात सक्रीय होवून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ह्यांचा संदेश देणारी धर्मनिरपेक्ष राज्य घटना तयार करून तूम्ही नव्या भारताचा उदय केला.

बाबासाहेब तूम्ही मनाने मेलेल्या समाजाच्या मनात क्रांतीचे, बंडाचे बीज रोवून "१०० वर्षे शेळी सारखे जगण्यापेक्षा १ दिवस वाघासारखे जगा"हे तूमचे जळजळीत उद्गाराने दलित जनतेच्या मनात क्रांतीचा अंगार फुलला.माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवण्याचा एक महासंग्राम सुरु झाला ज्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.

बाबासाहेब तूमचा  लढा संपत्ती किंवा सत्ता मिळवण्याचा नव्हता तर माणुसकीचे हक्क मिळवण्याचा होता.दलितांना पाणी पिण्याचा हक्क मिळावा म्हणून लढावे लागले हि जगातल्या इतिहासातातील एकमेव घटना असावी.

 कायद्याद्वारे प्रस्थापित मार्गाने क्रांतीकारी बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेचे  बाबासाहेब आपण थोर समर्थक होते. त्यामुळेच समाजाला आवश्यक असलेले बदल घटनात्मक मार्गानेच घडवून आणावेत, असा तूमचा कटाक्ष होता.आज तूमच्या स्वप्नांचा भारत निर्माण झाला आहे का ?

लुप्तप्राय झालेल्या बुद्ध धम्माला पुनर्जिवित करण्याचे महान कार्य तूम्ही केले.या धम्माचे बाबासाहेबांनी पुनरूत्थान करून विसाव्या शतकात केलेला बुद्धधम्मोदय हे महान कार्य करणाऱ्या बाबासाहेबांना बुद्घधम्म पुनरूत्थानाचे जनक म्हटले जाते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून बाबासाहेबांनी समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.

जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धांची गरज आहे, असे विश्वशांतीचे विधान करणाऱ्या विद्वानाची १४ एप्रिल जयंती उत्सव. या पावन दिनी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये या दिवशी सुटी असते. परंतू, केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुटी म्हणून जाहीर केला आहे. कामगार, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने याचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामुळे यंदापासून या दिवशी सरकारी कार्यालयांबरोबरच औद्योगिक आस्थापनांमध्ये सार्वजनिक सुटी देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, कॅनडातील एका प्रांतातही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल हा 'समता दिन' म्हणून साजरा करण्यात आलेला  आहे.ही अभीमानाची बाब आहे. 

नि:स्वार्थी लोकसेवेमुळे एक आदर्श व प्रेरणादायी व्यक्ती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव एक महान आहे. अस्पृश्य समाजातील एका सर्वसामान्य कुटुंबात १४ एप्रिल १८९१ रोजी जन्म घेवून अस्पृश्यतेचे चटके आणि अवहेलना यांना सामोरे जात पराकाष्ठेची जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मात करत त्यांनी अखंड ज्ञानसाधना केली. समाजाला बौद्ध धर्माची दीक्षा देताना बाबासाहेब आंबेडकरांनी २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या. या प्रतिज्ञा देण्यामागे धर्माच्या जोखाडातून दलितांची सुटका करणे हा मुख्य उद्देश होता.तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा मानवी कल्याणकारी धागा पकडून बाबासाहेब तूम्ही सर्वजनहिताय सर्वजन सुखाय भारतिय संविधान बनवले आहे. जे सर्वश्रेष्ठ आहे. 

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे आपण सांगत. ''प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे असे आपले म्हणणे हाेते.समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आपण  प्रतिपादन केलेली आहे.

जातिवाद मिटवून भाग्यविधाता बनलेल्या बाबासाहेबांनी २० मार्च १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील ‘महाड’ येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता.

याला महाडचा मुक्तिसंग्राम म्हणून ही ओळखले जाते. यामुळेच भारतात २० मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो.तरी देखील आजही जातीवाद समाजात ठाण मांडून असल्याचे अनेकदा लक्षात येते.

अगदी काही दिवसांपूर्वीची घटना,उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमधील डासनामध्ये एका मुस्लीम मुलाला मंदिराच्याब आवारातील पाणी पिण्यावरुन मारहाण करण्यात आली. ही मारहाण करतानाचा व्हीडिओ प्रसारित झाला, नंतर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी  मारहाण करणाऱ्यांना अटक देखील केली.परंतू जातीभेदाच्या बुरसटल्या विचारांना समाजात जोपासत असलेल्यांना काय म्हणावे बाबासाहेब ...!

गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल या तूमच्या प्रेरणेने मंडळी जागी झाली खरी पण त्यांचा लढा यशस्वी होतोय का बाबासाहेब हा प्रश्न थैमान घालतो आहे. बाबासाहेब आपण अंधश्रद्धेचे कट्टर विरोधक होते. आपल्या वैचारिक त्याने समाजमनात रुजलेल्या देव, दैववाद, चमत्कार, बुवाबाजी आणि जातीव्यवस्थेवर आधारित अंधश्रद्धेवर टीका केली. तर्क आणि विज्ञानावर आधारित जीवनपद्धतीचा पुरस्कार केला , परंतु आजही आपला सुशिक्षित म्हणला जाणारा समाज हा हौशांची हौस नवश्यांचा नवस बोलत बुवा बाबांच्या भोंदुगिरीच्या विळख्यात अडकतो आहे हे समाज घातक आहे बाबासाहेब म्हणून आपल्यासमोर गर्हाणं मांडलंयं..!


कंचन मुरके,

प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ 

महिला मंच

(अमरावती) 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages