Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे अतिजोखमीच्या मातेचे वाचले प्राण;

 

 अचलपूरच्या मडकी येथील आरोग्य चमूची कामगिरी

अमरावती , दि. १३ ( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :  कर्तव्यदक्षता आणि वेळेवर घेतलेला अचूक निर्णयामुळे अचलपूर तालुक्यातील मडकी येथे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या चमूने केलेल्या अथक परिश्रमामुळे एका अतिजोखमीच्या मातेचे आणि तिच्या नवजात बालकाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. 'मिशन २८०' अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या गृहभेटी दरम्यान गरोदर मातेच्या आरोग्याचा धोका लक्षात आल्याने ही तत्परता दाखवण्यात आली, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

मडकी येथील रहिवासी मीनाक्षी अमोल धांडे या गरोदर मातेच्या घरी आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका भेटीसाठी गेल्या असता, मातेच्या पायावर सूज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला कुटुंबाने माहिती देण्यास टाळाटाळ केली, मात्र आरोग्य सेविकांनी तत्परतेने वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची सूचना दिली. डॉ. नीता निगोळे, डॉ. प्रशांत ढोके आणि प्रविणा धाकडे यांनी मातेची तपासणी केली असता, त्यांचा रक्तदाब अत्यंत धोकादायक पातळीवर असल्याचे आढळले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोग्य पथकाने कुटुंबाचे सविस्तर समुपदेशन केले आणि गरोदरपणात रक्तदाब वाढल्याने उद्भवणाऱ्या जीवघेण्या धोक्यांची जाणीव करून दिली.

 यावेळी मातेला तातडीने अचलपूर आणि त्यानंतर अमरावती येथील डफरिन रुग्णालयात हलविण्यात आले. डफरिन रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाल्याने मातेने एका गोंडस कन्येला सुखरूप जन्म दिला. सध्या माता आणि बाळ दोन्ही सुरक्षित असून, जिल्हा प्रशासनाच्या 'सुरक्षित मातृत्व अभियाना'चे हे यश मानले जात आहे.


 

Tags

Post a Comment

0 Comments