Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

ग्राहकांनी हक्कांबाबत सजगता बाळगावी -अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज



*जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा

अमरावती, दि. २५  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : देशात ग्राहकांचे हित जोपाण्यासाठी कायदे अस्तित्वात आहेत. मात्र याबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता दिसून येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत सजगता बाळगावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी केले.

जिल्हा पुरवठा कार्यालयातर्फे आज बचत भवन येथे जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, अन्न व औषधचे सहायक आयुक्त विनायक चव्हाण, वजन व मापे विभागाचे श्री. रिठे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटन मंत्री डॉ. अजय गाडे, अखिल भारतीय ग्राहक मंचचे जिल्हाध्यक्ष अशोक हांडे उपस्थित होते.

श्री. दानेज यांनी ग्राहकांना चांगल्या सेवा आणि वस्तू मिळाव्यात यासाठी कायदा तयार करण्यात आला आहे. तसेच दाद मागण्यासाठी जिल्हा ते राष्ट्रीय स्तरापर्यंत व्यवस्था उभारण्यात आली आहे. ग्राहकांचे हक्क अबाधित राहण्यासाठी ही तक्रार निवारणाची सोय करण्यात आली आहे. यासोबतच होलमार्क, आयएसआय मार्क यासारख्या गुणवत्ता राखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्याला पुरावे सादर करावे लागतात. यात संबंधित वस्तूचे देयक हे महत्वाचे असते. बियाणांमध्ये फसवणूक झाल्यास बियाणांची पिशवी आणि त्यातील थोडे बियाणे राखून ठेवणे आवश्यक आहे. यातून त्या बियाणांची उगवण क्षमता तपासता येते. ग्राहकांच्या हक्कांविषयी चळवळ उभी राहिली आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सेवा आणि वस्तू मिळण्यास मदत होत आहे.

यावेळी शिवांश मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे ग्राहकांच्या हक्क आणि सुविधांविषयी पथपाट्य सादर केले.


Post a Comment

0 Comments