विशेष लेख - जैन धर्माला प्रभावशाली बनवणारे भगवान महावीर ... - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, March 30, 2026

विशेष लेख - जैन धर्माला प्रभावशाली बनवणारे भगवान महावीर ...


दि. ३०

३१ मार्च भगवान महावीर यांची जयंती. जैन धर्मात महावीर जयंतीचे पर्व महापर्व म्हणून मानले जात आहे.दरवर्षी मोठी रथयात्रा काढली जाते. स्त्री मुक्तिदाता भगवान महावीर यांची शिकवण मानवी जीवनाचा मोलाचा ठेवा आहे.

क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकावं, आत्मविश्वास हे संरक्षणाचे साधन आहे,ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो,दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो,बुद्धिमंतांनी इतरांचा तिरस्कार करू नये.मनुष्य योग्य प्रयत्नांनी सर्व काही साध्य करू शकतो अशी अनेक शिकवण त्यांनी देत अहिंसा परमो धर्मः' असा संदेश त्यांनी जगाला दिला आहे.

महावीरांच्या आधी जैन धर्माचे २३ तीर्थंकर होऊन गेले. जैन धर्माला प्रभावशाली बनविण्याचे फार मोठे श्रेय महावीरांकडे जाते. जगातील प्रमुख. धर्मसंस्थापकांच्या मालिकेत महावीर यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेले आहे. त्यांची प्रवृत्ती लहानपणापासूनच चिंतनशील व वैराग्यशील होती.त्यानी वयाच्या तिसाव्या वर्षी गृहत्याग केला. ते 'महावीर' या नावानेच जगविख्यात झाले. त्यांना 'वीर', 'अर्हत्', 'सन्मति' व 'वैशालिक' अशा नावांनीही त्यांना ओळखले जायचे. महावीर वस्त्रे वापरीत नसल्यामुळे त्यांना 'निग्गंठ नातपुत्त' असेही म्हटले जात असे.

 भगवान महावीरांचा जन्म झाला तो कालखंड स्त्रियांच्या महापतनाचा होता. तत्कालीन समाज व्यवस्थेत स्त्रियांना महत्त्वाचे स्थान आणि सन्मान नव्हते. पशुंप्रमाणे तिची विक्री केली जात होती. चेतनाशक्ती असूनही जणू तिच्याकडे जड वस्तू म्हणून पाहिले जात होते.प्रभू महावीरांनी स्त्री शक्तीला आई, बहीण आणि कन्येसमान पाहिले. स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभूने प्रचंड संघर्ष केला. स्त्रियांची हरविलेली प्रतिष्ठा व सन्मान पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी ते म्हणतात, स्त्रियांना पुरुषांपेक्षा हीन समजणे अज्ञान आणि अधर्म आहे.

 महावीरांनी विकारांवर विजय मिळवला होता. गृहत्यागानंतर प्रारंभीच्या एका वर्षानंतर त्यांनी वस्त्राचाही त्याग केला. दंश करणाऱ्या कीटकांचीही त्यांनी हत्या केली नाही. अज्ञानी लोकांनी या काळात त्यांचा खूप छळ केला; पण त्यांनी तो शांतपणे सोसला. अखेरीस वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर पुढील ३० वर्षे ते धर्मोपदेश करीत राहिले.ज्ञानप्राप्तीनंतर लोककल्याणाच्या तळमळीने ते सर्वत्र फिरले. अहिंसेच्या तत्त्वावर ते भर देत असत.

महावीरांनी जातिव्यवस्थेवर हल्ला चढविला आणि सर्व जातिजमातींच्या लोकांना शिष्य म्हणून स्वीकारले. एवढेच नव्हे, तर स्त्रियांनाही संन्यासाचा अधिकार असल्याचे मान्य केले. सर्वसामान्य माणसांना आपला उपदेश समजावा यासाठी संस्कृत भाषेऐवजी अर्धमागधी या प्राकृत भाषेचा त्यांनी वापर केला. तत्त्वज्ञानातील क्लिष्ट कल्पना स्पष्ट करण्यासाठी महावीर दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे देत असत. तितिक्षा, क्षमा, अहिंसा, समता, त्याग इ. गुणांची परमावधी महावीरांच्या ठिकाणी झाली होती, असे म्हटले जाते.

    जैन धर्मात तीर्थंकरांनी सर्व प्राणी-मात्रांच्या कल्याणाचा आदर्श जगापुढे उभा केला. सर्व प्राणी-मात्रांमध्ये चैतन्यरूपी आत्मा आहे. त्या आत्म्यास जाणणे हाच जैन धर्माच्या तत्त्वचिंतनाचा केंद्रबिंदू आहे. जेव्हा यज्ञामध्ये बळी देण्याची प्रथा प्रचलित होती, सर्वत्र हिंसेचे प्रमाण वाढले होते, त्यावेळी आत्म्याच्या सन्मानासाठी भगवान महावीरांनी ‘जगा आणि जगू द्या’ असा संदेश दिला. अंधश्रद्धा, चमत्कार, नवस यांना जैनधर्म पुष्टी देत नाही.या विचारांची खरी गरज आज मानव जातीच्या कल्याणासाठी आहे हे समजून घेवून भगवान महावीरांना शत-शत नमन करूया..! 


कंचन अभिषेक मुरके,

अमरावती

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages