Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मेळघाटच्या विकासासाठी आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरणावर भर देणार -जिल्हाधिकारी आशिष येरेकर



अमरावती, दि.१३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): मेळघाट परिक्रमासाठी सेवा देणाऱ्या खाजगी दवाखान्यातील डॉक्टर्संना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधसाठा, वाहन सुविधा तसेच त्यांच्या राहण्याची सुविधा जिल्हा प्रशासनातर्फे पुरविण्यात येईल. मेळघाटच्या विकासासाठी येथील आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरणावर विशेष भर देणार, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज येथे केले.

 महसूल भवन येथे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विषयाची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. विभावरी दाणी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे तसेच संबंधित विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

मेळघाट परिक्रमाउपक्रमातंर्गत माहिती, शिक्षण आणि संप्रेषण अभियान राबविण्यासाठी शिवाजी सायन्स कॉलेजचा सहभाग राहील. या महाविद्यालयाचे विद्यार्थी मेळघाटमध्ये कोरकू भाषेतून पथनाट्य, कोरकू बांधवांना समजेल अशा भाषेत संवादसत्र असे विविध उपक्रम राबवून आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणार आहेत. अन्य महाविद्यालयांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. येरेकर यांनी यावेळी केले.

             मेळघाटमधील प्रामुख्याने होणारे कुटकी, सावा या मिलेट्स फूड्सबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवावा. बदलत्या जीवनशैलीत नागरिकांना मिलेट्सचे महत्त्व कळावे यासाठी जनजागृती करावी.  याअनुषंगाने मिलेट्स फुडच्या लागवडीखाली क्षेत्र वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात. हॉटेल्स तसेच दैनंदिन जीवनात नागरिकांचा मशरूम खाद्यान्नांचा वापर वाढला आहे. मशरूमची वाढती मागणी लक्षात घेता मशरूम ट्रेनिंग प्रोग्राम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांना यावेळी दिले. मराठवाडा दुग्ध प्रकल्पासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. या प्रकल्पातील लाभार्थ्यांना वैरण विकास चमूमार्फत सहकार्य पुरविण्यात यावे. तसेच या पूरक व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी आकृष्ट व्हावे, यासाठी जनजागृती करण्याचेही निर्देश श्री. सातपुते यांना दिले.

              प्राथमिक कृषी सहकारी संस्था ही ग्रामीण स्तरावरील तळागाळातील सहकारी पतपुरवठा संस्था आहे. थेट शेतकऱ्यांशी निगडित ही संस्था खते, बियाणे, कीटकनाशके पुरवणे, अल्प मुदतीचे कर्ज देणे आणि शेतमाल साठवणूक, विक्री यांसारख्या बहुउद्देशीय सेवा पुरविते.  या सहकारी संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देत असल्यामुळे येथील दोन-तीन गावातील महिलांना एकत्रित करून त्यांच्या आर्थिकस्तर उंचावण्यासाठी विशेष उपक्रम राबवून या महिलांना सहकार्य करण्याचे निर्देश महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना यावेळी देण्यात आले.

मोह फुलाचा हंगाम सुरू होत असून यावी उत्तम प्रतीची मोहफुले गोळा करण्यासाठी आवश्यक नेट सामग्री येथील स्थानिकांना उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी संबंधितांना निर्देश दिले.

             मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी मेळघाट येथील आरोग्य समस्यावर सर्व विभागांनी एकत्रित येऊन समन्वयाने कार्यप्रणाली राबविण्याचे निर्देश दिले. येथील गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी लवकरच मोबाईल एक्स-रे मशीन घेण्यात येईल. जेणेकरून अती जोखमीच्या गर्भवती महिलांची तपासणी करणे सोयीचे होईल. तसेच आशाकिट मध्ये बीपी मशीन देण्यासाठी त्यांनी सकारात्मकता दर्शविली.

             माजी प्राचार्य डॉ. विभावरी गाणी यांनी मेळघाट येथील आरोग्यविषयक विविध उपक्रम, जनजागृती कार्यक्रमायाबाबत माहिती दिली. मेळघाटमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी असून व्यसनाधिनता अधिक असल्यामुळे जनजागृती करण्यास अडचण निर्माण होते. यामुळे येथील नागरिकांना तंबाखू, दारू अशा विविध व्यसनाच्या विळख्यातून मुक्त करणे सर्वप्रथम गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावेळी मेळघाट क्षेत्रातील विद्युत पुरवठ्याबाबत आढावा घेतला. येथील विद्युत पुरवठा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी संबंधितांना निर्देश दिले. याबाबत चुर्णी येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली.


Post a Comment

0 Comments