Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचतगटांना संधी;नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आर्थिक सहाय्यासाठी आवाहन

  



अमरावती, दि. ८ जानेवारी (Gramin Uday News Netwark): नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-2 अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील कृषी व्यवसायांना मोठी चालना मिळणार आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पात जिल्ह्यातील 454 गावांची निवड करण्यात आली असून, विविध मूल्यसाखळी आधारित उपक्रम आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी शासनाकडून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना हवामान अनुकूल शेतीसाठी सक्षम करणे आणि शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे हा आहे.

प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला स्वयंसहाय्यता गट, प्रभाग संघ आणि ग्रामसभांना विविध उपक्रमांसाठी 60 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. विशेषतः शेतीकामात भासणारी मजूरांची टंचाई लक्षात घेता, महिला बचत गटांमार्फत 'गावस्तरीय कृषी अवजारे बँक' स्थापन करण्यासाठी 24 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान उपलब्ध आहे. तसेच, गोदाम उभारणी, शीतगृह, प्रक्रिया युनिट्स (दाल मिल, तेल गाळप, फळ प्रक्रिया इ.) आणि निंबोळी अर्क युनिट यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी प्रकल्प खर्चाच्या 60 टक्क्यांपर्यंत, म्हणजेच कमाल 60 लाख रुपयांपर्यंत बँक एंडेड अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे किमान 250 सभासद असणे आणि त्यांची वार्षिक उलाढाल प्रकल्प रकमेच्या 5 टक्क्यांपर्यंत असणे अनिवार्य आहे. तसेच, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांसाठी बँकेचे कर्ज मंजूर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. इच्छुक संस्थांनी प्रकल्पाच्या अधिकृत डीबीटी पोर्टलवर (https://dbt-ndksp.mahapocra.gov.in/) नोंदणी करून आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments