Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी कृषी पुरस्कारांसाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन



अमरावती, दि. ८ (Gramin Uday News Netwark): कृषी विभागामार्फत जिल्ह्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या संस्था, शेतकरी यांच्याकडून सन 2025 साठी विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी कृषी पुरस्कराचे प्रस्ताव दि. 31 जानेवारी 2026  पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात सादर करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार (पुरस्कार स्वरूप : 3 लाख रूपये रोख व स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार), वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, कृषीभूषण सेंद्रीय पुरस्कार ( 2 लाख रूपये रोख व स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार),  वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार ( 1 लाख 20 हजार रूपये रोख व स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार), उद्यान पंडीत पुरस्कार ( 1 लाख रुपये रोख व स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार,), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार (सर्वसाधारण व आदिवासी गट) ( 44 हजार रूपये रोख व स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार), युवा शेतकरी पुरस्कार (वयोमर्यादा कमाल 40 वर्षे)  (रूपये 1 लाख 20 हजार रूपये रोख व स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार )असे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

           कृषी क्षेत्रात शेती, फळबाग, कृषी संलग्न क्षेत्रात व प्रसारमाध्यमे संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट, संस्था पुरस्कारासाठी पात्र असतील.  शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावावर शेती असावी व शेती हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय असावा. कृषी क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणारा व अधिक नफा मिळविणारा असावा. कृषि पदवी, पदविका, पदव्युत्तर शिक्षण असल्यास प्राधान्य राहील.  प्रस्ताव सादरकर्ता हा शासकीय, निमशासकीय किंवा सेवानिवृत्त अधिकारी नसावा. कृषी भूषण सेंद्रीयसाठी सेंद्रीय मालाचे पीजीएस प्रामणीकरण केलेले असावे. जिल्हा पोलीस अधिक्षक यांचा सन 2025 चा चारित्र्य पडताळणीचा दाखला असावा. प्रस्तावासोबत अद्यावत 7/12, 8अ सादर करणे आवश्यक आहे. दि. 28 जुलै 2025 च्या मार्गदर्शक सूचना नुसार विहीत प्रपत्रात आवश्यक त्या पुराव्यासह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या वेबसाईटवर व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत. प्रस्ताव तीन प्रतीत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा. प्रस्ताव सादरकर्ता अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात  आले आहे.


Post a Comment

0 Comments