अमरावती, दि. २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): व्यावसायिक शिक्षण आणि जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून अमरावतीत उद्या, 24 डिसेंबर 2025 रोजी जागतिक कौशल्य स्पर्धा विभागीय पात्रता फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. श्रीकांत जिचकार भवन येथे ही स्पर्धा पार पडणार असून, जिल्हास्तरावर निवड झालेल्या उमेदवारांनी या विभागीय फेरीत आपले कौशल्य सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास केंद्राने केले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा ही दर दोन वर्षांनी होणारी जगातील सर्वात मोठी कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. 23 वर्षांखालील तरुणांसाठी ही स्पर्धा एखाद्या ऑलिम्पिक खेळाप्रमाणेच प्रतिष्ठेची मानली जाते. आगामी 2026 ची जागतिक कौशल्य स्पर्धा चीनमधील शांघाय येथे आयोजित करण्यात येणार आहे. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवारांची निवड जिल्हा, विभाग, राज्य आणि त्यानंतर देश पातळीवर केली जाणार आहे. यापूर्वी पार पडलेल्या 47 व्या जागतिक कौशल्य स्पर्धेत 63 सेक्टरमधून 50 देशांतील 10 हजारांहून अधिक उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता.
शांघाय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि सेक्टर स्किल कौन्सिल यांच्या सहकार्याने एकूण 63 क्षेत्रांशी संबंधित ही कौशल्य स्पर्धा होत आहे. अमरावती विभागात होणाऱ्या या पात्रता फेरीसाठी नोंदणीकृत उमेदवारांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिदजवळ, अमरावती येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments