अमरावती, दि. ११: खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ‘अमृत’च्या अमरावती विभागीय कार्यालयाचे काल उद्घाटन पार पडले.
अमरावतीतील आशीर्वाद बिल्डिंग, मालटकेडी समोर, बसस्टँड रोड, टोपेनगर येथे कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रबंधक संचालक सिद्धेश्वर वरणगावकर, राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडीलकर, अमरावती विभाग व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, तसेच जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार उपस्थित होते.
विजय जोशी यांनी, जिल्ह्यात ‘अमृत’चे कार्यालय सुरू झाल्याने कौशल्य विकास, प्रशिक्षण, रोजगारनिर्मिती, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, स्वयंरोजगार संधी आणि औद्योगिक मार्गदर्शन अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगार व उद्योजकतेच्या नव्या दिशांना चालना मिळणार असल्याचे सांगितले.
राज्यात विविध उपक्रम राबवणारी अमृत संस्था युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि औद्योगिक कौशल्य विकासाचे प्रबोधन करीत आहे. आता या सर्व सुविधा अमरावतीमध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असल्याने अनेक उपक्रमांची अंमलबजावणी जलदगतीने होणार आहे.
यावेळी विविध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तसेच अमृतचे लाभार्थी यांच्या यावेळी भेटी घेण्यात आल्या. उद्घाटन कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विविध जिल्ह्यातील अधिकारी, तसेच अमृत संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments