तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला यश! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 5, 2025

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला यश!



5 हजार 700 लोकांनी सोडले व्यसन; 5.84 लाखांचा दंड वसूल

अमरावती, दि. ६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यामध्ये 2017 पासून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला (NTCP) मोठे यश मिळाले असून, या कार्यक्रमामुळे तब्बल 5 हजार 700 लोकांनी तंबाखूचे व्यसन सोडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा समन्वय समितीमार्फत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमांतर्गत तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल 846 शाळांमध्ये  1 लाख 48 हजार 558 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून, जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, तंबाखू सोडण्यास मदत करण्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि तालुका स्तरावर एकूण 14 समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत, जिथे सन 2017 पासून आजपावेतो  90 हजार 328 लोकांना समुपदेशन करण्यात आले.

यासोबतच, कोटपा कायदा 2003  ची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे . सन 2017 पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 3 हजार 664 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून 5 लाख 84 हजार 416 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अन्न व औषध विभागाने 2018 पासून अवैध तंबाखूवर 212 कारवाया करत 5 कोटी 51 लाख रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त केला आहे.

या यशासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, पोलीस, शिक्षण व अन्न व औषध विभागाच्या समन्वयाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages