Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जिल्हा परिषदेचे अंतिम आरक्षण प्रसिद्ध; आगामी निवडणुकीसाठी ५९ जागा निश्चित, ३० जागा महिलांसाठी आरक्षित


अमरावती, दि. 0६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्हा परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरिता अंतिम आरक्षणाची अधिसूचना 3 नोव्हेंबर, 2025 रोजी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी  जाहीर केली. या  अधिसूचने अन्वये एकूण 59 निवडणूक विभागांसाठी आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. राज्य शासन, ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार प्रभाग रचना कार्यक्रमानुसार, 22 ऑगस्ट, २०२५ रोजी ५९ निवडणूक विभागांच्या भौगोलिक सीमा शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम मधील तरतुदी आणि राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, अमरावती जिल्हा परिषदेतील अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) आणि स्त्रियांसाठी (सर्व प्रवर्गातील महिलांसह) जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, आरक्षण सोडत काढून ती अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले होते. या कार्यक्रमानुसार, दि. 13 ऑक्टोबर, 2025 रोजी आरक्षित निवडणूक विभागांची जाहीर सोडत काढण्यात आली. त्यानंतर, दि. 14 ते 17 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत आरक्षण विभागनिहाय प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. प्राप्त हरकती व सूचनांवरील सुनावणी आणि अभिप्रायाचा विचार करून, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी या आरक्षणाला मान्यता दिली.

राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण अधिसूचित केले आहे. या अधिसूचनेनुसार, अमरावती जिल्हा परिषदेतील एकूण 59 जागांपैकी 30 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. प्रवर्गनिहाय आरक्षणाचा तपशील पाहिल्यास, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 11 जागा, त्यापैकी 6 महिलांसाठी; अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 12 जागा, त्यापैकी 6 महिलांकरिता; नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग  साठी 15 जागा, त्यापैकी 8 महिलांसाठी; तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 21 जागा असून, त्यापैकी 10 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.


Post a Comment

0 Comments