* तातडीच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र
अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात या हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर शासनाने दि. 9 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या नुकसान भरपाई मदतीच्या यादीत संपूर्ण जिल्ह्याचा समावेश नसल्याने उर्वरीत आठ तालुक्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी विभागीय आयुक्त यांना पत्र लिहिण्यात आले आहे.
मदतीच्या यादीत अमरावती, नांदगाव खंडेश्वर, चिखलदरा, धारणी, चांदुर बाजार आणि मोर्शी या सहा तालुक्यांचा समावेश आहे. तर उर्वरीत भातकुली, धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव, वरुड आणि तिवसा या आठ तालुक्यांचा समावेश नाही.
जिल्हाधिकारी यांनी तालुका आणि मंडळनिहाय अतिवृष्टीचा तपशील सादर केला आहे. काही तालुक्यांमधील 100 टक्के मंडळांमध्ये अतिवृष्टी होऊनही त्यांना वगळले आहे. यात 100 टक्के मंडळात अतिवृष्टी झालेले धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे तालुके यादीत नाहीत. तसेच अतिवृष्टी झालेला मंडळात भातकुली 83 टक्के, तिवसा 60 टक्के, दर्यापूर 38 टक्के, अचलपूर 17 टक्के आणि अंजनगाव 0 टक्के मंडळे यांचा मदतीच्या यादीत समावेश नाही. 71 टक्के मंडळात अतिवृष्टी झालेला वरुड तालुका यादीत नाही, मात्र समान 71 टक्केचा मोर्शी तालुका यादीत समाविष्ट आहे.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील एकूण 91 मंडळांपैकी 56 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यानुसार तालुकास्तरीय यंत्रणांनी नुकसानीचे अहवाल सादर केले आहे. सदर अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवण्यात आला आहेत. वगळलेल्या आठही तालुक्यात अतिवृष्टी, पूर, सततच्या पावसामुळे शेतीपिक, फळपिकाचे नुकसान झालेले आहे. तसेच अचलपूर आणि अंजनगाव तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याचे तालुकास्तरीय यंत्रणांनी कळविले आहे. या आठही तालुक्यांना सुधारीत निकषानुसार मदत मिळण्याची विनंती करण्यात आली आहे.
Post a Comment
0 Comments