अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अमरावती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि महिलांसाठीच्या जागा निश्चित करण्यासाठीची आरक्षण सोडत सोमवार, 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा आणि तालुका स्तरावर आयोजित करण्यात आली आहे. यासंबंधीची परिशिष्ट-7 नुसारची सूचना 10 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व तहसिलदार व पंचायत समिती कार्यालये तसेच स्थानिक वृत्तपत्रे व संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या जागांसाठीची आरक्षण सोडत दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे काढण्यात येणार आहे. याच दिवशी सकाळी 10.30 वाजता धारणी, चिखलदरा, अंजनगांव सुर्जी, चांदुर बाजार, वरुड, तिवसा, अमरावती, धामणगांव रेल्वे आणि नांदगांव खंडेश्वर या पंचायत समित्यांची आरक्षण सोडत संबंधित तहसिल कार्यालयांमध्ये घेण्यात येईल. तर, दुपारी ३ वाजता दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, भातकुली आणि चांदुर रेल्वे या पंचायत समित्यांची सोडत संबंधित तहसिल कार्यालयांमध्ये काढली जाईल. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीच्या या आरक्षण सोडत कार्यक्रमास ज्या रहिवाशांना उपस्थित राहायचे आहे, त्यांनी वरील नमूद ठिकाणी व वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments