अमरावती, दि. ७ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : राणी दुर्गावती जयंतीनिमित्त शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या धारणी शाखेने महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत पात्र 12 लाभार्थी महिलांना वैयक्तिक व्यावसायिक कर्ज मंजुरी आदेश परतवाडा येथील कार्यक्रमात वाटप केले.
आदिवासी विकास महामंडळाचे संचालक आमदार केवलराम यांनी विरांगना राणी दुर्गावती यांनी अल्प काळात अनेक योजना, धोरणाची अंमलबजावणी केली. विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचप्रमाणे आदिवासी महिलांनी शबरी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन वैयक्तिक विकास साधावा, हीच खरी प्रेरणा ठरेल, असे मत व्यक्त केले.
सुरवातीला विरांगना राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात राणी दुर्गावती यांच्या कार्य आणि धोरण, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर प्रकाश टाकण्यात आला. शबरी महामंडळाच्या योजनांद्वारे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी, कर्ज वितरणाद्वारे लघु उद्योग, व्यवसाय, कृषीपूरक व्यवसाय व सेवाक्षेत्रात महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे. यात 12 महिलांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे कर्ज मंजुरी आदेश प्रदान करण्यात आले.
शाखा व्यवस्थापक गणेश साखरे यांनी प्रास्ताविकातून महामंडळाच्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्रकल्प समन्वयक सचिन देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
Post a Comment
0 Comments