Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

सेवा पंधरवड्यात नागरिकांनी सहभागी व्हावे - उपविभागीय अधिकारी अनिल भटकर

 अमरावती, दि. 17 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 'सेवा पंधरवडा' राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अमरावतीचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी दिली आहे.

या पंधरवड्यात तीन टप्प्यांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात पाणंद रस्त्यांची मोहीम हाती घेण्यात येईल, ज्यात गावातील सर्व रस्त्यांची यादी तयार करून 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभेत ती अंतिम केली जाईल. अतिक्रमण झालेल्या रस्त्यांचे सीमांकन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात येईल आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या रस्त्यांना क्रमांक देऊन त्यांच्या नोंदी गावदप्तरात घेण्यात येतील. 17 सप्टेंबरपासून पाणंद रस्त्यांवर वृक्षारोपणही केले जाईल.

दुसऱ्या टप्प्यात 'सर्वांसाठी घरे' या उपक्रमांतर्गत घरे बांधण्यासाठी उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जे हक्काने दिली जाईल. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमांनुसार नियमित केली जातील आणि धारकांना पट्टे वाटप केले जातील.

तिसऱ्या टप्प्यात ‘आदिसेतू’ अभियानांतर्गत मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरे आयोजित केली जातील. या शिबिरांमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे आणि विविध योजनांचा लाभ दिला जाईल. तसेच, 'गाव तिथे स्मशानभूमी' या मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. 'जिवंत सात बारा' मोहिमेअंतर्गत मयत व्यक्तीचे नाव कमी करून वारसाचे नाव लावणे आणि सातबारावरील अनावश्यक नोंदी कमी करण्याची कामेही केली जातील.

त्याचप्रमाणे विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, हरित महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र वृक्ष लागवड मोहिम राबविणे तसेच संत सेवालाल महाराज बंजारा, लमान तांडा समृध्दी योजना राबविण्यात येणार आहे.

ग्रामसभांनीही रस्त्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन गावात कायमस्वरूपी मजबूत रस्ते तयार करण्यासाठी सहकार्य करावे, तसेच सर्व नागरिकांनी 'सेवा पंधरवड्यात' सहभागी होऊन योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री. भटकर यांनी केले आहे.


Tags

Post a Comment

0 Comments