अमरावती, दि. 13 (ग्रामीण उदय प्रतिनिधी ) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने अचलपूर येथील जगदंब महाविद्यालयात 11 सप्टेंबर रोजी आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 350 पेक्षा अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला. यातील 112 उमेदवारांनी प्राथमिक निवड फेरी यशस्वी केली आहे, यातून अंतिम 22 जणांची निवड 'ऑन-स्पॉट' करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमाकांत शेरेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव भिमराव दखणे, रजनी शेरकार, प्राचार्य डॉ. अविनाश कोहळे उपस्थित होते.
डॉ. शेरेकर यांनी युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित केले. तसेच विदर्भातील उद्योजकता आणि रोजगाराच्या संधीवर प्रकार टाकला. तसेच युवकांना उद्योगांची दिशा दाखविण्यासोबतच रोजगारक्षम उमेदवारांना नवी संधी मिळावी, यासाठी प्रेरणा दिली. सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी मेळाव्यातून जिल्ह्यातील तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. यातून युवकांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले.
मेळाव्यात विविध क्षेत्रांतील जवळपास 20 हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला. यात 280 रिक्त पदांसाठी 408 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातील 112 उमेदवारांची प्राथमिकस्तरावर निवड करण्यात आली. तसेच 22 उमेदवारांना जागेवरच नियुक्ती देण्यात आली.
डॉ. मयुरेश सिंगरूप यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वैभव पाटील यांनी आभार मानले. मेळाव्यासाठी मार्गदर्शन अधिकारी सुभाष गुल्हाणे, कृपा अरगुलेवार, तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, जगदंब महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
00000
Post a Comment
0 Comments