निसर्गरक्षण हीच खरी देशसेवा - डॉ. कमलताई गवई
· वन प्रशिक्षणार्थी वनरक्षक व वनपालांना दिला हृदयस्पर्शी संदेश
· चिखलदऱ्याच्या वन प्रशिक्षण संस्थेतील तरुण वन प्रशिक्षणार्थी डॉ. कमलताई गवईंच्या आशीर्वादाने भारावले
चिखलदरा (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : “पर्यावरण, जंगल आणि वन्य प्राणी ही केवळ संपत्ती नाहीत; ते आपल्या अस्तित्वाचे प्राण आहेत. त्यांचे रक्षण करणे म्हणजे राष्ट्राची खरी सेवा. ही पवित्र जबाबदारी तुम्ही प्रेमाने, करुणेने आणि समर्पणाने पार पाडा.” असे आवाहन माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांनी केले. त्यांच्या शब्दांनी सभागृहातील प्रत्येक वन प्रशिक्षार्थ्याच्या मनात निसर्गरक्षणाची नवी शपथ अंकुरली. त्यांच्या डोळ्यांतून झळकणारा आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून वातावरण भारावून गेले.
भारताचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री व माजी लेडी गव्हर्नर आचार्य डॉ. कमलताई गवई यांनी दि. २३ ऑगस्ट ला सकाळी ११ वाजता वन प्रशिक्षण संस्था, चिखलदरा येथे दिलेल्या सदिच्छा भेटीत ममतेचा, करुणेचा आणि प्रेरणेचा झरा उधळला. यावेळी वन प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका मुक्ता टेकाळे, पद्मश्री डॉ.सौ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र दिपक दादा गायकवाड, क्रीडा प्रशिक्षक सुधीर आक्केवार, वन्यजीव अभ्यासक मुकेश चौधरी, प्रसन्न गायकवाड, गोपाल गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात वड वृक्षाचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. या प्रसंगी प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी वनरक्षक व वनपालांशी त्यांनी भावनिक संवाद साधला. त्यांच्या साध्या, परंतु थेट अंत:करणाला भिडणाऱ्या शब्दांनी उपस्थित प्रत्येकाच्या मनात कर्तव्याची नवचेतना निर्माण झाली.
डॉ. गवई म्हणाल्या, "तुम्ही निवडलेला वन सेवेचा मार्ग खडतर असला तरी त्यामध्ये सेवेचा भाव जोडला तर तुमचा मार्ग सुकर होईल. त्यासाठी वेळ काढून पुस्तके वाचा, विपश्यना करा, निसर्गाची सेवा करण्याची संधी प्रत्येकाला मिळतेच असे नाही. आज माझ्यासमोर तुम्हाला युनिफॉर्ममध्ये बघून आनंद होतो. मी स्वतः अनेक वर्षापासून हजारो झाडं लावली आहेत आणि लावत राहणार. मला रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ होता येणार नाही पण मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. आज माझा मोठा मुलगा भूषण गवई हा भारताचा सरन्यायाधीश आहे, तो अनेक समाज हितासाठी चांगले- चांगले आणि धडाडीचे निर्णय घेत आहे, त्याच्या हातून देशसेवा घडत आहे हे बघून मला आनंद होतो, असे म्हणत संकट घेऊन रडत बसण्यापेक्षा मार्ग काढत राहा अशा शब्दात त्यांनी प्रशिक्षणार्थींना धीर दिला. संवाद दरम्यान त्यांच्या प्रत्येक शब्दात मातृहृदयाची ऊब आणि करुणेचा झरा उमटत होता. त्यांनी शांत, परंतु ठाम स्वरात सांगितले, "ज्या मातेच्या हातून आशीर्वाद मिळतो, ती कृपा आयुष्यभर सोबत राहते. आजचा हा क्षण वनसेवेसाठी झटणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या जीवनात अनमोल प्रेरणादायी ठेवा बनून राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. करुणामयी मातृहृदयातून लाभलेला आशीर्वाद हा त्यांच्या जीवनात अनमोल प्रेरणेचा ठेवा ठरेल, अशी भावना आमच्या सर्वांच्या मनात दाटून आली, असे वन प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका मुक्ता टेकाळे यांनी आभार प्रदर्शनातून सांगितले. या प्रसंगी संस्थेतील वन प्रशिक्षार्थींच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आत्मविश्वास झळकत होता. एका मातृहृदयातून मिळालेला आशीर्वाद त्यांच्यासाठी नवीन ऊर्जा आणि प्रेरणा ठरला. ही सदिच्छा भेट प्रशिक्षणार्थी वनरक्षक व वनपालांच्या आयुष्यात स्मरणीय क्षण ठरली. चिखलदऱ्याच्या हिरव्यागार डोंगरकपारींमध्ये वसलेल्या वन प्रशिक्षण संस्थेला आज एक विलक्षण भावस्पर्शी क्षण लाभला. करुणा, ममता आणि प्रेरणेने नटलेली ही भेट चिखलदऱ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जाईल, अशी भावना संचालन करताना वनरक्षक पूजा देवराम बेंडकोळी यांनी व्यक्त केली.
चौकट
सिंधुताई सपकाळ यांचे स्वप्न पुर्ण करा!
पद्मश्री डॉ.सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह चिखलदरा येथे त्यांनी सदिच्छा भेट देऊन आदिवासी मुलींना मार्गदर्शन केले. मेळघाटातील आदिवासी मुलींना शिक्षित करण्यासाठी सिंधुताईंनी १९८० च्या काळात पुढाकार घेतला. आज एवढ्या वर्षात हजारो मुली शिक्षण घेऊन बाहेर पडल्या आहेत. तुम्ही मुलींनी खूप खूप शिक्षण घेऊन सिंधुताईंचे स्वप्न पुर्ण केले पाहिजे, "मुलींनो तुम्ही शिकलात तर आपल्या मेळघाटला लागलेला कुपोषणाचा कलंक दूर होण्यासाठी तुमचे शिक्षण उपयोगी पडेल, तसेच आदिवासिंचा स्तर उंचावण्यास मैलाचा दगड ठरेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड, सचिव अरूणभाऊ सपकाळ, अधिक्षिका सरीता सपकाळ, प्रसाद सपकाळ, जान्हवी सपकाळ, यांच्यासह संस्थेतील मुली, कर्मचारी वृंद उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments