Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

नैसर्गिक आपत्तीचे केवळ १५ दिवसांत पंचनामे अपलोड


*तत्पर प्रशासनाने आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत

अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जलदगतीने मदत पोहोचवण्यासाठी पावले उचलली आहेत. नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करून नैसर्गिक आपत्तीचे केवळ १५ दिवसांत पंचनामे अपलोड करण्यात आले आहे. यामुळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळण्यास मदत होणार आहे.

जून २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिक, फळपिकाच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ऑगस्ट २०२५ मध्ये शासनाने मान्यता दिली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर तात्काळ मदत देण्यासाठी बाधित शेतकऱ्यांच्या याद्या केवळ १५ दिवसांच्या कालावधीत, म्हणजे २२ ऑगस्ट २०२५ पर्यंत ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने जिल्हास्तरावरुन या याद्यांना मान्यताही मिळाली आहे.

तसेच एप्रिल आणि मे २०२५ या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिक, फळपिकांच्या नुकसानीसाठी २२ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली आहे. संबंधित तालुक्यांकडून एकूण १७,६६९ बाधित शेतकऱ्यांच्या २३ कोटी २७ लाख रूपयांच्या याद्या ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. या याद्यांनाही जिल्हास्तरावरुन मान्यता मिळाली आहे.

नैसर्गिक आपत्तीमधील मदत हा शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत जिव्हाळा आणि महत्त्वाचा विषय आहे. जिल्हा प्रशासन पात्र शेतकरी लाभार्थ्यांचे अनुदान वितरणासाठी आवश्यक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने दक्ष असून कार्यरत आहे, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments