अमरावती, दि. १८ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामकाजात गती आणण्यासाठी, स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सात अधिकाऱ्यांची तालुका पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर हे मोर्शी व वरुड, निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे दर्यापूर व अंजनगाव सुर्जी, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे अमरावती व नांदगाव खंडेश्वर, रोहयो उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर ज्ञार धारणी व चिखलदरा, महसूल उपजिल्हाधिकारी विवेक जाधव अचलपूर व चांदुर बाजार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रध्दा उदावंत भातकुली व तिवसा, विशेष भुसंपादन अधिकारी प्रसन्नजित चव्हाण चांदुर रेल्वे व धामणगाव रेल्वे तालुक्यांसाठी तालुका पालक म्हणून कार्य करतील.
नियुक्त करण्यात आलेले अधिकारी तालुक्यातील महसूल, विकास, आपत्ती व्यवस्थापन, तसेच शासन योजनांच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवतील. तसेच, तालुकास्तरीय कार्यवाहीचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला मासिक अहवाल सादर करतील. सदर अधिकारी नियुक्त तालुक्यात किमान १५ दिवसांतून एकदा शक्यतो बुधवारी भेट देतील. तसेच संजय गांधी निराधार योजनेत लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, ॲग्रीस्टॅक नोंदणी, आधार प्रमाणिकरण, घरकुल आदी योजनांच्या अंमलबजावणीबाबत तालुका पालक कार्य करतील. यासोबतच तालुकास्तरीय यंत्रणांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतील.
Post a Comment
0 Comments