Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

दादासाहेब गवई स्मारक उभारण्यासाठी गती द्यावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर


         अमरावती, दि. १०  : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अमूल्य योगदान येणारे रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे स्मारक ही जनतेसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कार्याला समर्पित अशा स्मारकाच्या कामाला विविध यंत्रणांनी गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज रा. सू. गवई स्मारकाबाबत विविध यंत्रणांची आढावा बैठक घेतली. यावेळी कमलताई गवई यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

श्री. येरेकर म्हणाले, दादासाहेबांचे स्मारक प्रामुख्याने तीन भागात विभागाले आहे. यात दादासाहेबांचा पुतळा, चित्रप्रदर्शनी आणि श्रोतृगृह असणार आहे. पुतळा उभारण्यासाठी जे. जे. स्कूलशी पाठपुरावा करून पुतळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रक्रिया जलद गतीने करण्यात याव्यात. यात आवश्यक असलेला कालावधी कमी करणे शक्य असल्यास तपासून पहावे. यासोबतच गरजेनुसार असलेल्या परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे.

चित्र प्रदर्शनीमध्ये लावण्यात येणाऱ्या छायाचित्रांची संख्या आणि त्यानुसार छायाचित्रांची निवड करण्यात यावी. याठिकाणी येणाऱ्या नागरिकाला सुस्पष्ट दिसतील, अशा पद्धतीने छायाचित्रे लावण्यात यावी. तसेच याठिकाणी दादासाहेबांचा जीवनपट दाखवणारी भिंत तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक प्रसंगांची निवड समितीच्या मान्यतेने घ्यावी. किऑस्क, व्हीडीओ, दादासाहेबांचे कृत्रिम बुद्धीमत्तेने केलेली भाषणे याबाबत कार्य करताना समितीचा सल्ला घ्यावा.

स्मारकामध्ये श्रोतृगृह बांधण्यात येणार आहे. सदर श्रोतृगृह विद्यापीठाला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाने अनुषंगीक कार्यवाही करावी. प्रामुख्याने वीज जोडणी, कर यासारख्या बाबींवर प्रक्रिया सुरू करावी. न्यास नोंदणी झाल्यानंतर विद्यापीठाशी हस्तांतरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे. स्मारकासाठी न्यास नोंदणी करण्याचे शासन निर्णयात नमूद आहे. त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्यात यावी. स्मारक पूर्णत्वास जाण्यासाठी प्रत्येक आठवड्यात याबाबत बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने वेळापत्रक तयार करावे, यातून अप्रतिम स्मारक उभे राहावे, यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश त्यांनी दिले.




Post a Comment

0 Comments