Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

कांदाचाळ, लसूण साठवणूक गृहासाठी अर्ज करण्याचे आवाहन


अमरावती, दि. १४  (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृहासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकरी सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्थानिकरित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा सडून नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणावर विपरीत परिणाम होतो. शास्त्रशुद्ध कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्यगुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असल्याने कांदाचाळ उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२५-२६  या आर्थिक वर्षामध्ये कमी खर्चाचे कांदाचाळ, लसूण साठवणूकगृह या घटकाच्या मापदंडात सुधारणा करण्यात आली आहे. ५  ते २५  मेट्रीक टन २५ ते ५००  मेट्री टन आणि ५००  ते १  हजार मेट्रीक टन क्षमतेच्या कांदाचाळी, लसूण साठवणूकगृह उभारणीसाठी क्षमतेनुसार अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. सदर घटकाचा प्रकल्प खर्च ३०  लाख रूपयांपेक्षा जास्त झाल्यास बँककर्ज अनिवार्य आहे. अर्थसहाय्य हे बँककर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात देय राहणार आहे.

अनुदान मर्यादा ही कमी खर्चाचे कांदाचाळ, लसूण साठवणूक गृह, खर्च मर्यादा सात हजार रूपये प्रति मेट्रीक टन, अनुदान मर्यादा ही सर्वसाधारण व अनुसूचित क्षेत्राकरिता ५  ते १  हजार मेट्रीक टन क्षमतेसाठी यथाप्रमाणाआधारे ग्राह्य भांडवली खर्चाचा 50 टक्के तपशीलाप्रमाणे ५ ते २५  मेट्रीक टनाला दहा हजार रूपये प्रति मेट्रीक टन, २५ ते ५००  मेट्रीक टनाला आठ हजार रूपये प्रति मेट्रीक टन, ५००  ते १  हजार मेट्रीक टनाला सहा हजार रूपये प्रति मेट्रीक टन आहे.

लाभार्थी पात्रता निकषात शेतकऱ्‍याने योजनेंतर्गत अर्ज करताना त्याच्या स्वतःच्या मालकीची जमिन असणे आवश्यक आहे. सात बारा उतारावर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांकडे कांदा पिक असणे बंधनकारक आहे. सदर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्याचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्‍यांचे उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल.

इच्छुक शेतकऱ्यांनी योजनेच्या अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, कांदाचाळ, लसूण साठवणूक गृह या घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी mahadbt.maharashtra.gov.in  पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments