· जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विभागीय आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण
अमरावती, दि. ६ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते काल दि. ५ जून रोजी वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या घराच्या आवारात आईच्या नावाने एक झाड लावावे. राज्य शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ अभियानाची अमरावती विभागात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन श्रीमती सिंघल यांनी याप्रसंगी केले.
अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके यांच्यासह विभागीय आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व विशद करुन श्रीमती सिंघल म्हणाल्या की, प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने वृक्षारोपण कार्यक्रम राबवावा. राज्य शासनाने हरित महाराष्ट्र, समृध्दी महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात १० कोटी वृक्ष लावण्याचे उद्दीष्ठ ठेवले असून त्यात आपलाही सहभाग नोंदविण्यासाठी आजपासून ते १५ ऑगस्टपर्यंत विभागाला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन सद्यस्थिती जाणून घेण्यात येणार आहे. वृक्षारोपणाचे महत्त्व जाणून प्रत्येकाने यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा. मुबलक प्राणवायू निर्मितीसाठी तसेच ग्लोबल वार्मिंगपासून येणाऱ्या पिढीला सुरक्षित करावयाचे असल्याने प्रत्येकाने वृक्षारोपणाची चळवळ बळकट करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल यांनी यावेळी केले.
यावेळी उपस्थित विभागीय आयुक्तालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पृथ्वीच्या व सृष्टीच्या संरक्षणासाठी वृक्षारोपण करुन एक पेड माँ के नाम उपक्रम प्रामाणिकपणे राबविणार असल्याची शपथ घेतली.

super 👍
ReplyDelete