अमरावती, दि. ५ (कार्यालय प्रतिनिधि ) : जिल्ह्यातील गावांच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाची पी. एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत 'मॉडेल सोलर व्हिलेज' या योजनेसाठी पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांकडून करून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. पात्र असलेल्या गावांकडून १६ जूनपर्यंत प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. स्पर्धेतील विजेत्या गावाला १ कोटी रुपयांचा विशेष विकास निधी मिळणार असून, यातून गावात विविध सौर ऊर्जा आणि समुदाय-आधारित प्रकल्प राबवता येतील.
या निधीमुळे गावांना विविध कामे हाती घेता येणार आहेत. गावासाठी मोठे सौर ऊर्जा प्रकल्प (उदा. बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम्स) उभारता येतील, ज्यामुळे संपूर्ण गावाला स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा मिळेल.
महिला बचतगटांना विविध सौर-आधारित उपक्रमांसाठी ९० टक्के पर्यंत आर्थिक सहाय्य मिळेल, ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेचे साधन प्राप्त होईल.
गावातील शाळा, आरोग्य केंद्रे आणि इतर शासकीय इमारती सौर ऊर्जेवर चालतील, ज्यामुळे विजेचा खर्च वाचेल आणि पर्यावरणीय फायदा होईल.
यामुळे गावातील रस्ते सौर दिव्यांनी प्रकाशित होतील, ज्यामुळे सुरक्षितता वाढेल. याव्यतिरिक्त, इतर सौर-आधारित तंत्रज्ञानावर आधारित अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पही राबवता येतील.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर ऊर्जेवर चालणारे पंप उपलब्ध होतील, ज्यामुळे डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी होईल.
प्राथमिक स्तरावरील सहकारी संस्था, डेअरी आणि मत्स्योद्योग प्रकल्पांसारख्या उपक्रमांना ९० टक्के पर्यंत आर्थिक मदत मिळेल, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र गावांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा ) , विभागीय कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा. कार्यालयाच्या domedaamravati@mahaurja.com या ईमेल आयडीवर अथवा दूरध्वनी क्रमांक 0721-2661610/ 8669911011 वर संपर्क साधता येईल, किंवा प्रत्यक्ष भेट देऊनही माहिती मिळवता येईल. हा निधी गावांना आत्मनिर्भर आणि ऊर्जा-कार्यक्षम बनवण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे , अशी माहिती विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी दिली आहे .
Post a Comment
0 Comments