विशेष लेख - बलिप्रतिपदा दिवस निमित्ताने प्रजाहितदक्ष बळीराजा



दिवाळी हा सण  दिवसाचा प्रकाशाचा आणि प्रकाशाबरोबर येतो आनंद -  उत्साह. या 5 दिवसातील शेवटचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदेचा.

 आसाम मध्ये 'बिहू', दक्षिणेत ओणम आणि मध्य व उत्तर भारतात 'बलिप्रतिपदा' म्हणून भारतभर साजरा केला जातो. बलीप्रतिपदा सण म्हणजे दानसूर राजा महासम्राट बळीराजा याच्या स्मरणार्थ हा सण संपूर्ण भारतात बहुजन समाज साजरा करतो. भारतात बळीराजाचे नाव ऐकलं नाही असा  कोणी सापडणार नाही. प्रत्येकाने बळीराजा हे नाव ऐकलेले आहे. वेगवेगळ्या संदर्भाने ते कदाचित वाचले असेल. परंतु बळीराजाचा पौराणिक ग्रंथामध्ये - आर्य साहित्यामध्ये - ग्रंथामध्ये चुकीच्या पद्धतीने बळीराजाचा वर्णन करण्यात आलेला आहे. या बळीराजाला एकीकडे दानशूर म्हटल्या जातो तर दुसरीकडे राक्षसांचा राजा असं सुद्धा संबोधल्या जातो.  मग प्रश्न असा पडतो की; जो दानशूर आहे तो राक्षस राहू शकत नाही आणि जो राक्षस आहे तो दानशूर होऊ शकत नाही.  मग बळीराजाला या दोन्ही पद्धतीने का बरं संबोधल्या गेले असेल. तर यात पौराणिक ग्रंथांचा लेखन करणाऱ्या लेखकांची मात्र द्विधा मनस्थिती झालेली आहे .  द्विधा मनस्थिती होण्यामागचं कारण म्हणजे आहे तो बळीराजा लोकांपर्यंत जाऊ न देता आपल्या सोयीचा बळीराजा लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या ग्रंथनिर्मात्यांची द्विधा मनस्थिती झाली आणि त्यांची चोरी पकडल्या गेली. 

          बळिराजा म्हणजे कोण? तर त्याकरिता बळीराजाची वंशावळ बघूया. कश्यपमुनी यांना दोन पत्नी दीती व अदिती. दिती पासून कश्यपमुनीला हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू असे दोन पुत्र.  हिरण्यकश्यपूला पुत्र सल्हाद, अनुल्हाद, अल्हाद व प्रल्हाद असे चार पूत्र. या चार पुत्रा पैकी प्रल्हादाचे दोन पुत्र ते म्हणजे विरोचन व कपिलमुनी. राजा विरोचन आणि सुरुची यांचा पुत्र म्हणजे बळीराजा. बळीराजा व राणी विंध्यवतीचा मुलगा बाणासुर होय.  बळीराजा हिरण्यकश्यपूचा पणतु, प्रल्हादाचा नातु आणि कपिलमुनी या तत्वत्याचा पुतण्या.(काही अभ्यासकांच्या मतानुसर कपिलमुनीच्या वंशाची शाखा तथागतपर्यंत जातो) 

       या वंशावळीमध्ये गंमत बघा कश्यप हे  ऋषी कुळातील आणि त्यांना झालेली दोन मुलं हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू राक्षस कुळातील ठरतात.  हिरण्यकशुपाचा प्रल्हाद मुलगा हा देव ठरतो तर प्रल्हादाचा नातू आणि कपिलमुनी या तत्वत्याचा पुतण्या दानशूर,  शेतकरी हिताचा राजा बळीराजा राक्षस ठरतो. म्हणजे ही वंशावळ बघितल्यानंतर मोठा लोचा पौराणिक ग्रंथांमध्ये झाल्याचा  दिसतो.  'दाल मे कुछ काला नही, तो पुरी दाल ही काली है|' हे आपल्या लक्षात येईल.  बळीराजाचा अनेक पौराणिक ग्रंथामध्ये असा उल्लेख केलेला आहे की, बळीराजा हा अत्यंत शूरवीर होता, दानशूर होता आणि याच्या शूरवीरतेमुळे -  दानशूरतेमुळे  देवलोक सुद्धा घाबरलेले होते; त्यामुळे त्यांना असं वाटत होतन की देव लोकातील स्वर्गावर सुद्धा बळीराजा ताबा मिळवेल. तस होऊ नये म्हणून बळीराजाचा बंदोबस्त करण्याच्या उद्देशाने विष्णूने वामनाचा अवतार धारण केला आणि विष्णूने वामनाचा अवतार घेऊन बळीराजाला तीन पावलं जमीन मागितली. ही गोष्ट तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे; त्यामुळे त्या पूर्ण गोष्टीचा इथं उल्लेख करत नाही. या गोष्टीचा उल्लेख आणि त्या गोष्टीचे तार्किक विश्लेषण महात्मा फुले यांनी त्यांच्या गुलामगिरी ग्रंथामध्ये तर डॉ. आ. ह. साळुंखे सर यांनी बळीवंश  या ग्रंथामध्ये केलेला आहे . आपण ते ग्रंथ अवश्य वाचून घ्यावे.   

             बळीराजाच्या बाबतीत एक मात्र नक्की आहे की,  बळीराजा हा दानशूर राजा होता आणि दानशूर असलेला व्यक्ती राक्षस राहू शकत नाही. तो वाईट वृत्तीचा राहू शकत नाही. तो लोकांचं अहित करू शकत नाही. लोकांना दुःख होईल असं राज्यकारभार करू शकत नाहीत.  हे समजण्या इतपत आपण पात्र आहोत. म्हणजे ज्याच्या दानशूरपणाच्या गोष्टी आजही सांगितल्या जातात तो म्हणजे बळीराजा. त्याचबरोबर राष्ट्रहित, न्याय आणि स्वाभिमान या मूल्यां विषयी जागरूक असणारा राजा म्हणजे बळीराजा.  त्यामुळेच आजही या भारतामधील माय - माऊल्या भाऊबीजेच्या दिवशी 'इडा - पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो' म्हणून भावाला ओवाळणी घालून ओवाळणीत बळीराजाचे राज्य परत येण्याची प्रार्थना करत आहेत. 

             ज्या देशातील शेतकऱ्याला बळीराजाच्या नावाने संबोधल्या जातो तो बळीराजा राक्षस कसा असणार? जर बळीराजा राक्षस असेल तर मग काय इथल्या शेतकऱ्यांना इथली व्यवस्था राक्षस समजतो काय? हा प्रश्न आमच्या मनामध्ये का येत नाही? बळीराजाला राक्षस म्हणणाऱ्यांना आम्ही याचा जाब का विचारत नाही? 

              अरे बळीराजा म्हणजे ज्याने अनेकदा इंद्राचा पराभव केला होता. जो कोणालाही घाबरत नव्हता . जो यज्ञ संस्कृतीचा विरोधक होता. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या प्राण्यांचा जो रक्षण करत होता, तो राजा म्हणजे बळीराजा. कपटनीतीचा वापर करून इथल्या वर्णवादी व्यवस्थेने ज्याला मारले तो बळीराजा.  विष्णूने वामनाचा अवतार घेऊन दानांमध्ये बळी कडून तीन पावले जमीन मागितली म्हणतात. ते तीन पाऊले म्हणजे दुसरे -  तिसरे काही नसून बळीराजाचे सामर्थ्य नष्ट करण्याच्या हेतूने शिक्षण,  संपत्ती आणि सत्ता हिसकावणे होय.  हे आम्ही समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही हे समजून  घेतलं नाही तर नव्या रूपाने आमच्यापुढे नवा वामन उभा आहे. तो आम्हाला शिक्षणातून, संपत्तीतून,  सत्ता नसलेल्या सत्तेतून,  धार्मिकतेतून बेदखल करण्याचा प्रयत्न करत आहे. 

              महात्मा फुलेंनी त्यांच्या गुलामगिरी ग्रंथात म्हटले आहे की,  हा देश बळीराजाचा आहे. महात्मा फुलेंनी 'दस्यूचा' पोवाडा लिहिलेला आहे त्यात ते बळीराजाला कुलस्वामी मानतात.  त्या आमच्या कुलस्वामी बळीराजाला नव्या पिढीने नव्या पद्धतीने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.  त्याकरीता वाचन करणे आवश्यक आहे. 

              बळीराजा जर राक्षस असता तर त्याच्या नावाने विविध वर्तमानपत्रे, अनेक मासिके प्रकाशित केल्या गेली नसती. शेतीशी संबंधित अनेक घटकांना बळीराजाचे नाव दिल्या जात आहे. त्याच्या नावाने जे परिसंवाद होतात.  वेगवेगळ्या ठिकाणी बळी महोत्सव साजरा केल्या जात आहे. बळी महोत्सवानिमित्ताने व्याख्याने आयोजित केला जात आहेत. बळीराजा राक्षस असता तर हे महोत्सव आयोजीत केल्या गेले नसते.  त्यामुळे बळीराजा हा राक्षस नाही तर आमचा कुलस्वामी आहे.  त्याला आपल्या काळजात आणि आपल्या मेंदूत जपणे अत्यंत आवश्यक आहे. याउलट ज्या वामनाला देवाचा अवतार मानल्या जातो त्या वामानाचे नावही कोणी घ्यायला तयार नाही.

             पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये बलिप्रतिपदेला प्रतीकात्मक बळी बनवून शेतावर ठेवतात. जसं बळीराजाने त्याच्या राज्यात शेतकऱ्यांचे हित जोपासले तसेच आताही बळीराजा आजही आम्हा शेतकऱ्यांचे रक्षण करण्याची एक प्रकारे प्रार्थना करतात.  

                    एकंदरीत काय तर बळिराजा शेतकरी, कष्टकऱ्यांचे हित जोपासणारा प्रजाहितदक्ष राजा होता.  गरज असणाऱ्यांना मदत करणारा दातृत्ववान राजा होता. त्याच्या दातृत्व गुणामुळे सर्वदूर लोकप्रियता पसरलेली होती. बळीराजाच्या लोकप्रियतेमुळे आर्यवंशियाना त्यांचे राज्य प्रस्थापित करणे कठिण झाले होते. त्यामूळे कपटनितीचा वापर करुन मारले. राक्षस म्हणून  हजारो वर्षापासून बळीची बदनामी करत राहिले. प्रजेने मात्र या न्यायी, शेतकरी हित रक्षक राजाला आपल्या काळजात 'इडा पिडा टळो, नी बळीचे राज्य येवो' म्हणत जपून ठेवले आहे. 


أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday