दि. ११ शिरजगाव कसबा
शिरजगाव कसबा ते परतवाडा रोडवरील शेतशिवारात अज्ञात चोरट्यांनी पाच शेतकऱ्यांच्या मोटार पंपांच्या केबल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
शिरजगाव कसबा ते परतवाडा रोडवरील शेतशिवारात शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार पंपांना विद्युत पुरवठा करणाऱ्या तांब्याच्या केबल अज्ञात चोरट्यांनी कापून चोरून नेल्या आहेत.
या घटनेत एकूण पाच शेतकऱ्यांच्या मोटार पंपांच्या केबल लंपास झाल्या आहेत.
सदाशिव भाऊराव डोमणे (वय ७५ वर्षे, रा. शिरजगाव कसबा) आणि इतर चार शेतकऱ्यांनी सोमवार, दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनमध्ये या चोरीची तक्रार दाखल केली. केबल चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतातील पिकांना वेळेवर पाणी देण्याच्या कामात मोठी अडचण निर्माण झाली असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमन सिरसाट या प्रकरणाचा पुढील तपास करत असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
अशा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी शेतशिवारात रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
