अमरावती,दि. १० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): शहानूर मध्यम प्रकल्पामध्ये यंदाच्या रब्बी हंगामासाठी पाणी सोडणे अशक्य असल्याचे जलसंपदा विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी पडलेला अपुरा पाऊस आणि अल-निनो तसेच आयओडी (इंडियन ओशीयन डायपोल) च्या प्रभावामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा घटला आहे. शहानूर धरण क्षेत्रात पाणीसाठा शिल्लक नसल्यामुळे यंदा रब्बी हंगाम २०२६-२७ राबविणे शक्य होणार नसून उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आल्याचे अचलपूर मध्यम व लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गु. उमप यांनी कळविले आहे.
अचलपूर मध्यम व लघुपाटबंधारे विभागाने जाहीर प्रकटनानुसार शहानूर धरणाची सद्यस्थिती आणि पाणी नियोजनाची माहिती कळविली आहे. त्यानुसार ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत धरणात एकूण ३४.०९ दश लक्ष घनमिटर (दलघमी) म्हणजेच ७४.०५ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून वार्षिक सरासरी बाष्पीभवनाप्रमाणे यातील ५.५० दलघमी पाणीसाठा कमी होणार आहे. धरण परीक्षेत्रातील नगरपरिषदा, ग्रामपंचायती आणि शासनाच्या अन्य पाणीपुरवठा योजनांसाठी २३.२८ दलघमी पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. तर शासकीय निर्णयाच्या अधीन राहून ३.५० दलघमी म्हणजेच १० टक्के पाणी हे आकस्मीक राखीव साठा म्हणून ठेवण्यात आले आहे. गुरे-जनावरांसाठी १.७५ म्हणजेच ५ टक्के पाण्याचा राखीव साठा ठेवण्यात आला असल्याने शेतीच्या रब्बी हंगामासाठी धरणात पाणी शिल्लक नसल्याचे अचलपूर मध्यम व लघुपाटबंधारे विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.
शासकीय आदेशानुसार, भविष्यात प्रत्यक्षात पाऊस पडून धरणात उपलब्ध होणाऱ्या पाणी साठयातून प्रथम पिण्यासाठी, वीज निर्मितीसाठी व औद्योगिक वापरासाठी पाणी आरक्षित करण्यात येणार आहे. त्यानंतर उपलब्धता लक्षात घेऊन सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल.जलसंपदा विभागाने पाणी वापर संस्था, लाभधारक आणि नागरिकांना पाणी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती समजून प्रत्येकाने त्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, धरणातून किंवा कालव्यातून पाण्याचा अनधिकृत वापर केल्यास 'महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६' मधील तरतुदींनुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,पाणी पुरवठ्याबाबत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी होणार नाही, यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे कळविण्यात आले आहे.
