अमरावती दि. ४ : एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये अधिसूचित चार पिकांसाठी अमरावती विभागातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पीक विमा घेण्याचे आवाहन विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक यांनी केले आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत गहु (बागायत), हरभरा व रब्बी कांदा या पिकाकरिता १५ डिसेंबर २०२६ पर्यंत सहभागी होता येणार असून उन्हाळी भुईमूग पिकाकरिता ३१ मार्च २०२७ पर्यंत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी https://pmfby.gov.in पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी राज्य शासनाद्वारे उत्पादनावर आधारीत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२६ व रब्बी हंगाम २०२६-२७ या १ वर्षाकरीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्यात येत आहे. रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये गहू (बागायत), हरभरा, उन्हाळी भुईमुग व रब्बी कांदा ही ४ पिके या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ, क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार आहे. कर्जदार शेतक-यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकामार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. जर कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसेल तर नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या https://pmfby.gov.in या अधिकृत पोर्टलवर वर स्वत: शेतकऱ्यांना , बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजेंट, क्रॉप इंन्शुरन्स ॲप व सामुहिक सेवा केंद्र (सीएससी) यांच्या मार्फत योजनेतील सहभाग नोंदविता येणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी/जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे. अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांसाठी इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ९ वा मजला, ऑफिस ए, नेक्सस वेस्टेंड, सेक्टर १, बिल्डिंग ए, सर्व्हे क्र.१६९/१, परिहार चौकाजवळ, डीपी रोड, औंध, पुणे ही कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. संपर्कासाठी supportagri@iffcotokio.co.in हा ईमेल देण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यासाठी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड डी-३०१, तिसरा मजला, इस्टर्न बिझनेस डिस्ट्रिक्ट (मॅग्नेट मॉल), लाल बहादूर शास्त्री मार्ग, भांडुप (पश्चिम), मुंबई. नियुक्त करण्यात आली असून pmfby.maharshtra@hdfcergo.com या ईमेल वर संपर्क साधता येणार आहे. वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चौथा मजला, टॉवर क्र.७ कॉमरझोन आयटी पार्क, सम्राट अशोक पथ, येरवडा जेल रोड, पुणे ही कंपनी नियुक्त करण्यात आली असून bagichelp@bajajallianz.co.in या ईमेलवर संपर्क साधता येणार आहे.
गहू पिकासाठी बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा हप्त्यापोटी ११२.५० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. तर अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांसाठी अनुक्रमे ४५० व ४२५ रुपये विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. हरभरा पिकासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा हप्त्यापोटी १८० रुपये,अकोला जिल्ह्यासाठी ३४१.८० रुपये, वाशिमसाठी १७०.९० रुपये, अमरावतीसाठी ३६० तर यवतमाळसाठी ५४० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. रब्बी कांद्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा हप्त्यापोटी ४७५० रुपये, अकोला जिल्ह्यासाठी २१९ तर अमरावतीसाठी १६४० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. उन्हाळी भुईमूगासाठी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा हप्त्यापोटी ६०९ रुपये, वाशिमसाठी १०१.५० रुपये,अमरावतीसाठी ४०६ तर यवतमाळसाठी ६०९ रुपये निश्चित करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.
