दि. २४ नोव्हेंबर २०२६
केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नवे डिजिटल व्यासपीठ म्हणजेच ‘ॲग्री वेल्फेअर’ हे नवे संकेतस्थळ सुरु केले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सर्व योजना, अनुदान आणि शेतीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळाबद्दलची ही माहिती...
प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान ही एक अनिवार्य अशी बाब आहे. शासनाचा कारभार अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक आहे. माहिती आणि तंत्रज्ञान हे जबाबदार आणि उत्तरदायित्व असलेले प्रशासन निर्माण करते. लोकाभिमुख प्रशासन, विकासात्मक प्रशासन आणि सुप्रशासन अस्तित्वात येण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाशिवाय भविष्यात दुसरा चांगला पर्याय उपलब्ध होवू शकणार नाही. म्हणून शासन आणि त्यामधील विविध घटक यांनी सदैव माहिती आणि तंत्रज्ञान याच्या वापराला प्राधान्य आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. तरच एक लोकाभिमुख, जबाबदार, उत्तरदायी, पारदर्शक, गतिमान आणि परिणामकारक असे सुप्रशासन अस्तित्वात येवू शकेल. ही बाब लक्षात घेऊन अनेक विभागांचे संकेतस्थळ आणि पोर्टल तयार करण्यात येत आहेत.
माहिती व तंत्रज्ञान विकसित करून, त्याचा शासकीय कामकाजात जास्तीत जास्त वापर करून शेतकरी, शेतमजूर, कामगार, दीन-दलित, मागासवर्गीय इत्यादी समाजघटकांना शासन-प्रशासनाकडून प्राधान्याने चांगल्या सेवा सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. याच उदात्त हेतूने शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचे नवे डिजिटल व्यासपीठ ‘अॅग्री वेल्फेअर पोर्टल’ (agriwelfare.gov.in) हे नवे संकेतस्थळ सुरु करण्यात आले असून या संकेतस्थळाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सर्व योजना, अनुदान आणि शेतीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या "डिजिटल इंडिया" संकल्पनेला आणि शेतकरी कल्याणाच्या धोरणाला अनुसरून केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकासमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली 'अॅग्री वेल्फेअर’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.
अद्ययावत अशा या ‘अॅग्री वेल्फेअर’चे लोकार्पण 19 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात आले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या विविध कृषी योजना, आर्थिक मदत, अनुदाने आणि शेतीविषयक विश्वसनीय माहिती थेट मोबाईलवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे विविध योजनांची माहिती मिळविण्यासाठी सामान्य माणसाची व शेतकऱ्यांची शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार जाण्याची गरज कमी होणार असून मध्यस्थांवरील अवलंबित्वही घटणार आहे.
केंद्र सरकार शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून सदैव उपलब्ध असावे, ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्पष्ट संकल्पना आहे. तंत्रज्ञानाचा खरा उपयोग तेंव्हाच होतो, जेव्हा त्याचा लाभ शेतापर्यंत आणि ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचतो. असे मत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकार्पण प्रसंगी व्यक्त केले आहे.
या नव्या संकेतस्थळामुळे वेगवेगळ्या शासकीय संकेतस्थळांवर माहिती शोधण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागणार नाही. ‘अॅग्री वेल्फेअर’ या संकेतस्थळावर पीएम-किसान, अॅग्रीस्टॅक आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेसह विविध महत्त्वाच्या कृषीविषयक योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहे. पात्रता तपासणी, ऑनलाईन अर्ज आणि थेट लाभ हस्तांतरणाच्या (डीबीटी) सुविधांमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
संकेतस्थळावरील माहिती अचूक आणि नियमितपणे अद्ययावत ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले गेले आहेत. अपूर्ण किंवा कालबाह्य माहितीमुळे नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होऊ शकतो, यामुळे सदैव जागरूक राहून पोर्टलवरील माहिती नेहमी अद्ययावत राहील याची दक्षता घेण्यात येत आहे. अल्पभूधारक आणि कमी औपचारिक शिक्षण असलेल्या शेतकऱ्यांनाही हे पोर्टल सहज वापरता यावे, यासाठी भाषा आणि प्रक्रिया सोप्या ठेवण्यावर भर दिला आहे.
डिजिटल सुविधांचा प्रभावी वापर करता यावा, यासाठी देशभरातील कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या पोर्टलवर शेतकऱ्यांना हवामान, शास्त्रीय शेतीपद्धती, बियाणे व खतांची उपलब्धता आणि कृषीमालाचे बाजारभाव यांचीही माहिती मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपले शेतीउत्पादन वाढविण्यासाठी तसेच आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी पुरक ठरत आहे.
ग्रामीण भागातील मर्यादित इंटरनेट सुविधांचा विचार करून पोर्टल हलके आणि वापरण्यास सुलभ बनविण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींनाही त्याचा वापर करता यावा, यासाठी स्क्रीन रीडर आणि सुलभ नेव्हिगेशनसारख्या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
कोणत्याही पोर्टलचे यश त्यावरील माहितीच्या अचूकतेवर आणि वेळेतील उपलब्धतेवर अवलंबून असते. जुनी किंवा अपूर्ण माहिती प्रणालीवरील विश्वास कमी करते; त्यामुळे पोर्टलवरील सर्व माहिती सतत अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, पोर्टलची भाषा आणि प्रक्रिया इतक्या सोप्या असाव्यात की, अल्पभूधारक शेतकरी किंवा ज्यांचे औपचारिक शिक्षण कमी आहे, असे शेतकरीही सहजपणे हे व्यासपीठ समजू शकतील आणि वापरू शकतील. शेतकरी या पोर्टलचा आणि इतर डिजिटल साधनांचा वापर करण्यात सक्षम व्हावेत, यासाठी देशातील कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून एक विशेष प्रशिक्षण मोहीम राबवली जात आहे.
हे संकेतस्थळ केवळ शेतकरीवर्गासाठी मर्यादित न राहता, कृषी उत्पादक संस्था, प्राथमिक कृषी कर्ज समित्या, कृषी शास्त्रज्ञ, संशोधक आणि स्टार्टअप्स आदि घटकांना एकत्र आणून एकमेकांना जोडण्याचे काम करणार आहे.
हे नवीन संकेतस्थळ MeitY च्या DBIM 3.0 आणि GIGW 3.0 मानकांचे पालन करून विकसित करण्यात आले आहे. हे अत्यंत सुरक्षित, मोबाईलवर वापरण्यास सोपे आणि दिव्यांग व्यक्तींसाठी पूर्णपणे सुलभ आहे. हे व्यासपीठ 'पीएम-किसान', 'ॲग्रीस्टॅक' आणि 'प्रधानमंत्री पिक विमा योजना' या सारख्या प्रमुख उपक्रमांसाठी एक 'सिंगल-विंडो' म्हणजे एकाच ठिकाणी सर्व सुविधा देणारे प्रवेशद्वार म्हणून काम करणार आहे.
या संकेतस्थळामुळे पारदर्शकता निर्माण होईल आणि मध्यस्थांची पूर्णपणे हकालपट्टी होणार आहे. ऑनलाइन पात्रता तपासणी, थेट अर्ज सादर करण्याची सुविधा आणि थेट बँक खात्यात आर्थिक मदत जमा करणे (डीबीटी) यासारख्या वैशिष्ट्यांमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक होते आणि मध्यस्थांची भूमिका पूर्णपणे संपते.
कमी इंटरनेट गतीवरही हे पोर्टल कार्यक्षम राहील याची काळजी घेतली गेली आहे. ग्रामीण भागाचा विचार करून तयार केलेले हे पोर्टल वजनाला हलके आणि वापरण्यास सोपे आहे. हे साध्या स्मार्टफोनवर आणि जिथे नेटवर्क कमकुवत आहे, अशा ठिकाणीही सुरळीतपणे काम करते.
वेळेवर आणि अचूक माहिती हे पोर्टलचे वैशिष्ट्य आहे. शेतकऱ्यांना हवामानाची स्थिती, आधुनिक वैज्ञानिक शेती पद्धती, बियाणे व खतांची उपलब्धता आणि बाजारभाव याविषयी थेट आणि विश्वासार्ह माहिती मिळेल.
दिव्यांग व्यक्तींसाठी हे पोर्टल सुलभ करण्यात आले आहे. आधुनिक सरकारी मानकांनुसार विकसित केलेले हे पोर्टल दृष्टिहीन आणि दिव्यांग व्यक्तींसाठी वापरण्यायोग्य आहे. ते सहजपणे 'स्क्रीन रीडर' आणि सुलभ नेव्हिगेशनच्या माध्यमातून या संकेतस्थळाचा वापर करू शकतात.
माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे संकेतस्थळ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. पुढील काळात शेती आणि शेतकरी-शेतमजूर यांच्या उन्नतीसाठी हे प्रयत्न अधिक उपयुक्त ठरतील यात शंका नाही.

