अंजनगाव सुर्जी (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
आयुर्वेदिक औषधांसाठी अत्यंत महत्त्वाचे व औषधी गुणधर्म असलेले पानपिंपरी (पिंपळी) हे पीक घेणारा येथील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पिकाशी पूर्वापार जोडले गेलेले येथील कष्टळू 'बारी समाज' बांधव या पारंपरिक शेतीला टिकवून धरण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, सततचे दुर्लक्ष आणि वाढत्या खर्चामुळे हे महत्त्वाचे औषधी पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
बारी समाजाचे योगदान
पानपिंपरीला ओळख मिळवून देण्यात बारी समाजाचे मोलाचे योगदान आहे. अंजनगाव सुर्जी परिसरात बारी समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करून आहे. अत्यंत कष्टळू आणि मेहनती समाज म्हणून त्यांची ओळख असून, त्यांनी पानपिंपरीच्या शेतीतून राष्ट्रीय स्तरावर स्वतःचा मोठा नावलौकिक निर्माण केला आहे. कुटुंबातील महिला, पुरुष आणि मुले सर्वजण शेतात राबून या पिकाची अत्यंत काळजीपूर्वक जोपासना करतात.
पानपिंपरी विकण्यासाठी स्वतंत्र व हक्काची बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. योग्य भाव मिळत नसल्याने अखेर नाईलाजाने कमी किमतीत माल विकावा लागतो.
दर्जेदार उत्पादनासाठी आणि चांगल्या प्रतीची पानपिंपरी कशी तयार करावी, याबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला) किंवा कृषी विभागाकडून कोणतेही ठोस तांत्रिक मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नाही.
पीक तयार झाल्यावर ते दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो.
महागाई आणि रोगांच्या विळख्यात पीक दबले (शेतकऱ्यांची प्रतिक्रिया)
महिला शेतकरी सौ. सुनिता मनोहर मुरकुटे
यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, वाढती महागाई, मजुरीचे वाढलेले दर, बांबू, दोरी, सुतळी या साहित्यांचे वाढलेले भाव यामुळे आता हा खर्च पेलवणे अशक्य झाले आहे. त्यातच पीक वर्षभर सांभाळावे लागते, पण बाजारात योग्य भाव मिळत नाही. तसेच पिकावर पडणारे विविध रोग व किडींमुळे वर्षानुवर्षांची ही पारंपरिक शेती धोक्यात आली आहे. शासनाने यात तातडीने संशोधन करून मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शासनाने पानपिंपरी उत्पादक बारी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करावे आणि 'बारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची' स्थापना करावी.
आयुर्वेदिक औषध कंपन्यांशी थेट करार करून पानपिंपरीला योग्य हमीभाव मिळवून द्यावा.
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट अंजनगाव सुर्जी येथे येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा आणि या औषधी वनस्पती अभियानात त्यांचा समावेश करावा.
९०% पेक्षा जास्त आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाणारी ही महत्त्वाची वनस्पती जर टिकवायची असेल, तर केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय, राज्य शासन आणि कृषी विद्यापीठाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात ही शेती पूर्णपणे बंद पडेल आणि हे अमूल्य औषधी पीक दुर्मिळ होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


