पुस्तकांची मैत्री हीच समृद्ध समाजनिर्मितीची गुरुकिल्ली




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे 'मुंबई पुस्तक महोत्सव'चे उदघाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करत वाचनसंस्कृती अधिक समृद्ध आणि जिवंत ठेवण्याचे आवाहन केले.

पुस्तके म्हणजे विचारांना दिशा आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे मित्र!

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुस्तके ही केवळ ज्ञान मिळविण्याचे माध्यम नसून ती आपल्या विचारांना दिशा देतात, विचारांना पंख देतात, संवेदना जागृत करतात आणि जाणिवांचा विस्तार करतात. पुस्तकांच्या माध्यमातूनच प्रगल्भ आणि समृद्ध समाजाची निर्मिती होत असते. मुंबई पुस्तक महोत्सवाच्या उदघाटनापूर्वीच 70,000 लोकांनी नोंदणी केल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाचनसंस्कृती निश्चितपणे जिवंत राहील आणि आजची तरुण पिढी ती अधिक समृद्ध करेल, असा विश्वास व्यक्त केला. मुंबईकरांनी, विशेषतः तरुणाईने पुस्तकांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही आनंदाची बाब असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

मुंबईने जपली मराठी संस्कृती, अस्मिता आणि भाषेचा समृद्ध वारसा!

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून कला, साहित्य आणि संस्कृतीचेही महत्त्वाचे केंद्र आहे. मराठी पत्रकारितेचे जनक, 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांसारख्या विचारवंतांच्या कार्यातून मुंबईने मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता जपली. साहित्यिक व सांस्कृतिक चळवळींमुळे मुंबईची ओळख अधिक समृद्ध झाली आहे.

आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात माहिती सहज उपलब्ध होत असली, तरी मानवी संवेदना, करुणा, प्रेम, नैतिकता आणि मूल्यांची जाणीव तंत्रज्ञानाला नसते. या मानवी मूल्यांची जपणूक आणि विकास पुस्तकांच्या माध्यमातूनच होतो. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी विवेक, विचार आणि नैतिक मूल्ये आवश्यक आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी पुस्तकांशी मैत्री आणि वाचनाचे महत्त्व कधीही कमी होणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी मुंबई पुस्तक महोत्सव

नॅशनल बुक ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांगत, मुंबई पुस्तक महोत्सवाने दरवर्षी नवनवे विक्रम प्रस्थापित करावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. पुस्तकांसोबतच विविध साहित्यिक, विचारवंत, संपादक आणि कवी यांच्या विचारांचा देवाण-घेवाण या महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. नागरिकांनी आपल्या आवडीच्या विषयांवरील विविध चर्चासत्रांमध्ये सहभागी होऊन ज्ञान संपादन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

मुंबई पुस्तक महोत्सव हा केवळ पुस्तकांचा महोत्सव नसून आपल्या संवेदनांचा, मानवतेचा आणि भविष्याचा उत्सव आहे तसेच मुंबईच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून दरवर्षी हा महोत्सव आयोजित होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार रविंद्र चव्हाण, महोत्सवाचे मुख्य आयोजक आमदार अमीत साटम, आमदार पराग अळवणी, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी व इतर मान्यवर उपस्थित होते.

أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday